आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव्या आघाडीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार असल्याने, आचारसंहितेपूर्वीच सोमवारच्या बैठकीत मार्क्‍सवादी पक्षाने नाशिक व दिंडोरी या दोन्ही जागांसाठी सोमवारी निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. स्वच्छ प्रतिमा व मुलभूत प्रश्नांसाठी सतत संघर्षाच्या भूमिकेत राहणार्‍या नगरसेवक तानाजी जायभावे (नाशिक) आणि हेमंत वाघेरे (दिंडोरी) या उमेदवारांना मतदार निश्चितच कौल देतील, असा विश्वास ‘माकप’च्या या बैठकीतून व्यक्त झाला.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठवडाभरात लागू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ माकपने नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. एवढय़ावरच न थांबता सोमवारी झालेल्या बैठकीच्या निमित्ताने माकपने प्रचाराचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून (दि. 4) प्रचारास सुरुवात होणार आहे.
तानाजी जायभावे हे नगरसेवक असून, त्यांनी केलेल्या सामाजिक कामांची नाशिकला ओळख आहे. त्यामुळे ते एक सक्षम उमेदवार आहेत. तर वाघेरे हेदेखील आदिवासी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आले असून, ते प्रबळ उमेदवार असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. दोघाही उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाने चंग बांधला असून, अन्य पक्षांच्या बलवान उमेदवारांना कडवे आव्हान देण्याची व्यूहरचना आखण्यात आली असल्याचे डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.
सर्वसामान्य व गोरगरीब, आदिवासी जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी पक्षातर्फे सातत्याने संघर्ष करण्यात आला आहे. औद्योगिक, असंघटित, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर या वर्गासाठी केंद्र व राज्य सरकारला कायदे करावे लागले, ही पक्षाची फलर्शुती आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार व कामगारविरोधी धोरणाला विरोध करून सर्वांना न्याय देण्यासाठी पक्षाचा प्रमाणिकपणे प्रयत्न असून, हाच मुद्दा घेऊन मतदारांना साकडे घातले जाणार असल्याचेदेखील या वेळी डॉ. कराड यांनी सांगितले.