आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legal Metrology Department Eye Sight On Sweet Mart

मिठाई विक्रेत्यांवर राहणार करडी नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सण-उत्सवाच्या काळात मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या लुटीचे प्रकार लक्षात घेता, यंदा वजन मापे विभागाकडून गोपनीय पाहणी करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वजन मापे विभागाकडून कळवण्यात आले आहे.

दसरा-दिवाळीच्या काळातील वाढत्या मागणीमुळे मिठाईचे भाव देखील वाढवले जातात. तरीही अनेक विक्रेते सरासरी पाच ते दहा ग्रॅम मिठाई कमी देऊन पैसे पूर्ण आकारतात. गर्दी आणि वेळेअभावी ग्राहक याकडे लक्ष देत नाही. याचा फायदा घेत वजनातही ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वैधमापनशास्त्र विभाग यंदा मिठाई विक्रेत्यांवर करडी नजर ठेवणार असून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी होते फसवणूक
निव्वळ मिठाईचे वजन न करता बॉक्ससह वजन केले जाते. त्यात किमान 10 ग्रॅम माल कमी मिळतो. काही वेळा वजनाचे तयार बॉक्स बनवून ठेवले जातात. यामध्ये 100 ते 200 ग्रॅम माल कमी दिला जातो.

अशी टाळा फसवणूक
निव्वळ मिठाई मोजण्याचा आग्रह धरा, बंद पाकिटाचे वजन करून घ्या. तराजू बरोबर आहे, याची खात्री करा. किलोमध्ये मिठाई घेत असल्यास बॉक्सचे वजन वेगळे करा. नगावर घेत असल्यास नग मोजून घ्या. वजन, नग कमी भरल्यास वैधमापनशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.

असे आहेत नियम
दुकानदाराने निव्वळ मालाचे वजन करणे, दुकानाच्या दर्शनी भागात मुद्रांक भरल्याची पावती लावणे, बॉक्सवर आकार, वजन, बनवणार्‍याचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि बनवल्याचा दिनांक असणे गरजेचे आहे. जास्त दिवसांची मिठाई विक्री करू नये.


‘त्या’ विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार
मिठाई विक्रेत्यांवर विभागाचे निरीक्षक गुप्तपणे लक्ष ठेवणार असून, गैरप्रकार आढळल्यास विक्रेता परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाईल. ग्राहकांनी काळजीपूर्वक खरेदी करावी. फसवणूक होत असल्यास संपर्क साधावा. एस. एस. शिंदे, सहायक नियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग