आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार, नागरिक भयभीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पेलिकन पार्क, विजयनगर भागात बिबट्याने दर्शन दिल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले अाहेत. नागरी वस्तीत घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाळीव श्वानाचा बळी गेल्याचेही निदर्शनास अाले असून, याबाबत वनविभागाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा माग लागू शकला नाही. सलग दुसऱ्यांदा बिबट्याने या भागात दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी (दि. १३) पहाटे वाजेच्या सुमारास बिबट्याने मोरवाडी स्मशानभूमीच्या मागील बाजूस विजयनगर येथे नागरी वस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला. त्यात श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकाराने इतर श्वान भुंकू लागल्याने बिबट्याने पळ काढला. पेलिकन पार्कच्या दिशेने उडी मारून तो पळाल्याचे विमल जगताप यांनी पाहिले. या प्रकाराने इतर नागरिकही जमा झाले. अर्जुन वेताळ, अनिल राजपूत, संतोष जाधव, बशीर शेख, वैजनाथ भागवत, महेश जाधव, आशुतोष मिश्रा, नाना शेळके आदींनी वनविभागाला कळवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
सलग दुसऱ्यांदा बिबट्याचे दर्शन
काही महिन्यांपूर्वीच बिबट्याने थेट अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात दर्शन दिले होते. त्यावेळी मध्यरात्री आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला हाेता. त्यानंतर त्याने पेलिकन पार्ककडे धाव घेतली होती. त्यानंतर मात्र तो गायब झाला होता. अाता पुन्हा मंगळवारी पहाटे दुसऱ्यांदा बिबट्या या परिसरात आला. यावेळी मात्र त्याने श्वानाला लक्ष्य केले. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी बिबट्याला पकडण्याची मागणी केली अाहे.

शोधमोहीम सुरू आहे
^आम्हाला नागरिकांनी माहिती देताच संपूर्ण पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. पायांच्या खुणा पाहून तो बिबट्याच असण्याचा संशय आहे. दोन ते तीन दिवस सलग शाेध घेतला जाईल. -प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी

बिबट्याचा बंदोबस्त व्हावा
^याभागात बिबट्याने सलग दुसऱ्यांदा दर्शन दिले आहे. नागरिक या प्रकाराने प्रचंड घाबरले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त व्हायला हवा. प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन त्याला पकडायला हवे. -मिलिंद वागस्कर, नागरिक (फोटो)

जीव मुठीत घेऊन राहतो
^आम्हीपेलिकनपार्कच्या बाजूला राहणारे सर्वच नागरिक जीव मुठीत घेऊन राहतो. कधी सर्प तर कधी इतर समस्या.. आता मात्र थेट बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. -अर्जुन वेताळ, नागरिक

बंद पथदीपांमुळे हल्ला
^या भागात पथदीप बंद आहेत. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने श्वानावर हल्ला केला. येथे लहान मुले खेळतात, नागरिक ये-जा करतात. त्यांच्यावरही असा प्रसंग येऊ शकतो. -अनिल राजपूत, नागरिक

प्रचंड भीती वाटली
^श्वानांचा आवाज ऐकून मी बाहेर आले, मात्र बघते तर काय बिबट्याने श्वानाला जबड्यात पकडले हाेते. त्यानंतर मोठी उडी मारून ताे पेलिकन पार्कच्या दिशेने पळाला. या घटनेने प्रचंड भीती वाटली. -विमल जगताप, प्रत्यक्षदर्शी

नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती कळविताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली. यात त्यांनी बिबट्याच्या पंज्याचे ठसे घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, मधुकर गोसावी, विजय पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. मिलिंद वागस्कर, नितीन माळी, देवा वाघमारे, अॅड. अजय आव्हाड, मंगेश क्षीरसागर, योगेश पाटील, प्रवीण अाव्हाड यांनी पेलिकन पार्कमध्ये हल्ल्यातील मृत्युमुखी ‘तानिया’ या पाळीव श्वानावर अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...