आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी परिसरातील बिबट्या अखेर पिंजऱ्यात, वनविभागासह नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कधी तारवालानगर तर कधी मेरी परिसरात मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर मेरीतील जलगती परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास अडकल्याने वनविभागासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याच्या वावराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. 
 
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या पंचवटीतील तारवालानगर, म्हसरूळ तसेच मखमलाबाद परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरी वस्तीमधील बिबट्याच्या संचारामुळे वनविभागाच्या वतीने या भागात शोधमोहीम राबवून तीन-चार पिंजरे येथे लावण्यात आले हाेते. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांना सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड बनले होते. अशी परिस्थिती असताना दोन दिवसांपूर्वी मेरी येथील जलगती केंद्र परिसराच्या संरक्षक भिंतीलगत बिबट्या पुन्हा दिसल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती. या परिसरातील शासकीय कार्यालय, शाळा, नागरी वस्ती लक्षात घेता वनविभागाच्या वतीने जलगती केंद्र परिसरात पिंजरा लावण्यात आला हाेता. दरम्यान, सोमवारी पहाटे सावज शोधताना बिबट्या पिंजऱ्यात अडकला. तातडीने वन अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पिंजरा सुरक्षितस्थळी नेला. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बिबट्या पकडल्याचे समजताच नागरिकांनी जलगती केंद्र परिसरात गर्दी केली होती. 
 
वैद्यकीय तपासणी करून जंगलात सोडणार 
मेरी परिसरात संचार केलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वैद्यकीय तपासणी करून त्या बिबट्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. 
- प्रशांत खैरनार, वनअधिकारी 
 
आता भीती झाली दूर 
या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. वनविभागाने बिबट्या जेरबंद केल्याने नागरिकांची भीती दूर झाली आहे. 
- रुची कुंभारकर, नगरसेवक 
 
5 ते 6 वर्षे वयाचा बिबट्या 
मेरी परिसरात आढळलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून त्याचे वय साधारणत: 5 ते 6 वर्षे असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बिबट्याचा मेरी परिसरात मुक्तपणे संचार सुरू हाेता. 
 
वीस दिवसांपासून भीतीच्या छायेत 
मेरीयेथील तारवालानगर, मखमलाबाद येथील गंधारवाडी, मोरेमळा, हिरावाडी परिसरात बिबट्या दिसून आल्याने या परिसरातील नागरिक गेल्या १५-२० दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरत होते. मळे परिसरातील नागरिकांनी सायंकाळी तर घराबाहेर पडणेही बंद केले होते. बिबट्या जेरबंद झाल्याने अनेकांनी मोकळा श्वास सोडला. 
बातम्या आणखी आहेत...