नाशिक- मुंबई-आग्रारोडवरील विल्होळीजवळील रायगडनगर येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास एक बिबट्या एकनाथ मोहन गोहिरे यांच्या घरात घुसला. परंतु, प्रसंगावधान राखून महिला घराबाहेर पडल्याने अनर्थ टळला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री दहाच्या सुमारास बिबट्याला पकडले.
घरात स्वयंपाक करणाऱ्या महिलेला प्रारंभी कुत्रे वाटल्याने तिने त्याला हुसकावले, पण डरकाळीचा आवाज आल्याने तिची त्रेधातिरपीट उडाली. तिने घराबाहेर आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घराचे दरवाजे बंद करून बिबट्याला कोंडून दिले. पोलिसांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार पथकासह घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणली होती.
बिबट्या पकडल्यावर वैद्यकीय तपासणी झाली. या वेळी सहायक वनसंरक्षक पी. पी. भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर, वनपाल एम. एस. गोसावी, यू. बी. पाटील यांनी बिबट्याला पकडले.