आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Malnutrition Issue At Nashik, Divya Marathi

जंगलतोडीमुळेच बिबट्यांचे कुपोषण - आर. के. साहू यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रात झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे येथील बिबट्यांचे सर्वाधिक कुपोषण होत आहे. त्यांच्या शिकारीसाठी अनेक जंगलांमध्ये फारसे प्राणीच शिल्लक नसल्याने मग ते माकडे आणि कुत्री खाण्याच्या उद्देशाने रहिवासी वस्त्यांकडे येत असल्याच्या ज्वलंत प्रश्नावर अहमदाबादच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक आर. के. साहू यांनी प्रकाश टाकला.

येथील वसंत व्याख्यानमालेत आयोजित ‘वन्यजीव व्यवस्थापन आणि माझे अनुभव’ या विषयावरील पुष्प गुंफताना ते बोलत होते. वनामध्ये त्यांना ज्या प्रकारच्या अधिवासात राहण्याची सवय असते, त्याच प्रकारच्या अधिवासात त्यांना ठेवण्याचा अधिकाधिक प्रयास करणे आवश्यक असते. त्या वन्यजीवांना एकदा त्यांच्या मनासारखे वातावरण लाभले, तर त्यांच्या निर्मितीप्रक्रियेलादेखील चालना मिळून आरक्षित क्षेत्रातील वन्यजीवांची संख्या वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे त्यांना नैसर्गिक वातावरण मिळवून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतात तब्बल 400 प्राणिसंग्रहालये असून, तेथे विविध जाती-प्रजातींच्या प्राण्यांचे जतन केले जाते. सरपटणारे प्राणी हे थंड रक्ताचे असल्याने थंडीच्या काळात ते सर्वाधिक प्रमाणात मृत्युमुखी पडतात. अशा वेळी जमिनीवर कृत्रिम गवत लावून, तसेच मक्यरुरी बल्ब लावून त्यांचा जीव वाचवणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही आरक्षित क्षेत्रात जेव्हा वन्यजीव ठेवले जातात, तेव्हा त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते. सुयोग्य व्यवस्थापन केले तरच त्या जीवांचे खर्‍या अर्थाने संगोपन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. 2012 मध्ये अहमदाबादला बटरफ्लाय पार्क तयार करण्यात आला असून, तो संपूर्णपणे मुक्त स्वरूपाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.