नाशिक - वंजारवाडी व लहवित स्टेशन परिसरात रविवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या तसेच पिंपळगाव खांब शिवारातील बोराडे मळ्यातील एका वासराचा मृत्यू झाला असून, एक गाय गंभीर जखमी आहे. वंजारवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने रेल्वे गेटजवळ राहणार्या हौसा हिरामण शिवरे यांच्या गोठय़ातील सात शेळ्यांपैकी तीन शेळ्यांवर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झालेल्या शिवरे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील रहिवासी धावून आले. त्यानंतर बिबट्याने अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली. सोमवारी वनरक्षक दिलीप झगडे यांनी पंचनामा केला व पिंजरा लावणार असल्याचे सांगितले. लहवित स्टेशन परिसरातील प्रभाकर बिडाईत यांच्या तीन शेळ्यांसह पिंपळगाव खांब शिवारातील मनोहर बोराडे यांच्या मळ्यातील एका वासरालाही बिबट्याने रविवारी मध्यरात्रीनंतर फस्त केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. वनपाल एम. एस. गोसावी यांनी पंचनामे केले असून, येथे पिंजरे लावण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वनक्षेत्रात पाणीटंचाई जाणवायला लागताच बिबट्या आपला मोर्चा नागरी वसाहतीक डे वळवत असल्याने या काळात या घटनांत वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात येवला तालुक्यात पाण्याच्या शोधार्थ मळेवस्तीवर आलेले काळवीट कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाले होते.
वर्षात दुसरी घटना
बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या वर्षी घोडा व दोन शेळ्यांचा मृत्यू झाला होता. सध्या बिबट्याचे नियमित दश्रन होत असल्याने वनविभागाला कळवूनही ते दुर्लक्ष करीत आहे. घरात लहान मुले असल्याने बिबट्याची भीती वाटत आहे.
हौसाबाई शिवरे