आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलालपूरमध्ये पुन्हा बिबट्यांचा हल्ला; तीन शेळ्यांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: दोन दिवसांपूर्वीच जलालपूर येथे बिबट्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री पुन्हा बिबट्यांच्या हल्ल्यात आणखी तीन शेळ्या मरण पावल्या, तर एक शेळी जखमी झाली आहे. बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच सकाळी 7 वाजताच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.
नगरसेवक अशोक मुर्तडक यांच्या फार्म हाऊसमधील पाच शेळ्या फस्त केल्यानंतर एका दिवस उलटत नाही तोच बिबट्यांनी प्रकाश जाधव यांच्या मालकीच्या दोन शेळ्या व एक कोंबडा तसेच दत्तू नेहरे यांच्या घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला. त्यात एक शेळी नेहरे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली आहे.
तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्यांचा रात्रीच्या सुमारास मुक्त संचार वाढला आहे. जलालपूर परिसरातील नदीकाठ, घनदाट झाडी व बागायती शेती यामुळेच बिबट्यांनी आपला मुक्काम येथे ठोकला असावा, अशी चर्चा परिसरात आहे. प्रत्यक्षात वन विभागाने बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पिंजरे लावले आहेत. तसेच रेस्क्यू टीमदेखील स्थापन करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अद्यापही वन विभागाला त्यात यश आले नसून, नागरिकांना त्यामुळे आता घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. बिबट्याच्या भीतीपोटी सायंकाळी 8 वाजेनंतर नागरिकांनी घराच्या बाहेर जाणेच बंद केले आहे. आता तर दिवसाही रस्त्यावर शुकशुकाटच जाणवत आहे. आठवडाभरात सलग दुसर्‍यांदा बिबट्यांनी मुक्या जिवांवर हल्ला चढवल्याने दहशत पसरली आहे.