आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopards Presence Again Increases In Mahiravani Surrounding

बिबट्याचा वावर पुन्हा वाढू लागल्याने महिरावणी परिसरात भीतीचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन महिन्यांपूर्वीच महिरावणीतील लोणे मळ्यात बिबट्या पकडल्यानंतर पुन्हा एकदा या भागासह बरबडे वस्ती आणि पंचक्रोशीत बिबट्याच्या जोडीचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाला वारंवार सूचना देऊनही केवळ एकाच ठिकाणी पिंजरा लावण्यात आला अाहे. त्यातही पिंजऱ्यात शेळीची नियमित व्यवस्था केली जात नाही. पिंजऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली जात असताना, वनविभागाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महिरावणीतील लोणे मळ्यात एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर नागरिक काहीसे निश्चिंत होते. मात्र, पुन्हा बिबट्याचा वावर या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. विशेष म्हणजे बिबट्याची जोडी केवळ महिरावणीतील लोणे मळ्यातच नव्हे, तर महिरावणी परिसर, वासाळी, बरबडे मळा, गंगापूर, गोवर्धन, गंगावऱ्हे आणि बेळगाव ढगा अशी पंचक्रोशीत पुन्हा-पुन्हा आढळून येत आहे. तीन दिवसांपूर्वी लोणे वस्तीत एका गाय-वासरावर त्यांनी हल्ला केला. कुत्राही हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर बरबडे वस्ती आणि गोवर्धन परिसरात काही नागरिकांना जोडी दिसून आली. त्यामुळे त्यावर त्वरित उपाययोजना करत त्यांना वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी वन अधिकाऱ्यांना पिंजऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासह त्यात शेळीचीही नियमित व्यवस्था करण्याची मागणी केली. मात्र, वनविभागाकडून एकच जुना पिंजरा तेथे लावण्यात आला आहे.

वाढ शक्य नाही
नियमाप्रमाणे एका परिसरात एकच पिंजरा लावता येतो. त्यामुळे तेथे वाढ करणे शक्य नाही. बिबट्याचा वावर असलेल्या परिसराचा सर्व्हे करण्यात आला असून, त्यानुसारच पिंजरा लावलेला आहे. प्रशांत खैरनार, वन परिक्षेत्रपाल

पिंजऱ्यांची कमतरता
बिबट्याच्या भीतीने महिरावणी परिसरातील नागरिक रोजच जीव मुठीत धरून राहत असताना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी मात्र नियमानुसार जादा पिंजरे बसविता येत नसल्याचे सांगतात. यातून या अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.