आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच गावांचा पाणीपुरवठा झाला ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - ठाणगाव येथील उंबरदरी धरणातील अवैध पाणी उपसा रोखण्यात पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांना अपयश आल्याने ठाणगावसह पाच गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणी योजनेचा जॅकवेल पंप शनिवारी उघडा पडल्याने ठाणगावसह योजनेतील पाचही गावांना त्याचा फटका बसला आहे. चर खोदून जॅकवेलजवळ केलेल्या खड्ड्यात पाणी टाकण्याचे काम पाणीपुरवठा समितीने युद्धपातळीवर हाती घेतले, मात्र त्यात खंडित वीज पुरवठ्याचा अडथळा निर्माण झाल्याने रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत या गावांना पाणीपुरवठा झाला नाही.
उंबरदरी धरणक्षेत्रातील काही भागाचा वीज पुरवठा वितरण कंपनीने खंडित केला आहे. दुसरीकडे पाणी योजनेसाठीच्या फीडरवरील वीजपुरवठा, मात्र सुरू ठेवणे अपरिहार्य असल्याने शेतकरी त्याचा गैरफायदा उचलून रात्री धरणात विद्युत पंप टाकून पाण्याचा उपसा करत आहेत. दुसरीकडे ज्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्या भागातील शेतकरी चारचाकी गाडीत जनरेटर बसवून रात्री धरण पात्रात पंप टाकून पाण्याचा उपसा करत असल्याने धरणाने तळ गाठला आहे. सध्या धरणात मृत साठा शिल्लक असून, ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेसाठी अवघे काही दिवस पुरेल एवढाच साठा आहे. त्यातच पाऊस लांबल्याने योजनेचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कारवाई आणखी कडक करून रात्री धरणावर पहारा देण्याची गरज निर्माण झाली आहे. शनिवारी पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेलपंप उघडा पडल्याने योजना बंद पडली. त्यामुळे रविवारी योजनेचे विद्यमान अध्यक्ष केशव सहाणे, माजी अध्यक्ष नामदेव शिंदे यांच्यासह पदाधिका-यांनी धरण गाठून पर्यायी उपाययोजना हाती घेतली. जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून पात्रातील पाणी जॅकवेल भोवती केलेल्या छोट्या बंधा-यात टाकण्यात आले. त्यानंतर पाण्याचा उपसा सुरू केल्यानंतर दोन तासांनी वीज पुरवठाही खंडित झाल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत योजनेचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.
22 हजार लोकांना फटका
ठाणगावसह पाडळी, हिवरे, टेंभुरवाडी, पिंपळे ही मुख्य गावे आणि वाड्यावस्त्या मिळून सुमारे 22 हजार लोकसंख्या आहे. पाच गावांना दररोज सुमारे 5 लाख लिटर पाणी पिण्यासाठी लागते. धरणातील पाण्याची उपलब्धता पाहता ते किती दिवस टिकेल हाही प्रश्न आहे. त्यामुळे या गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. पाटबंधारे विभाग आणि वीज वितरण कंपनीने वेळीच कारवाई करून पाणी उपसा करणा-या शेतक-यांवर कारवाई केली असती, तर टंचाई जाणवली नसती.
शेतक-यांचे सहकार्य आवश्यक
- शेतक-यांना आवाहन करूनही पाणी उपसा थांबत नसल्याने योजनाच धोक्यात आली आहे. धरणात अल्पसाठा शिल्लक असून, पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ते पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पिकांसाठी शेतक-यांनी उपसा थांबवावा. शेतातील पिकांचा शासनाकडून पंचनामा करून त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, मात्र उपसा करू नये. तसेच पाटबंधारे आणि वीज वितरणच्या अधिका-यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
केशव सहाणे, अध्यक्ष पाणीपुरवठा योजना
खासगी विहिरींचे उपसे बंद करा
साठवण तलावातील साठा होतोय कमी, नगरसेवकांचे मुख्याधिका-यांना निवेदन
येवला २ पालखेड धरणावर शहरवासीयांची भिस्त अवलंबून असताना सध्या शहराला पाणीपुरवठा करणा-या साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. पाणीपुरवठा टप्पा क्रमांक दोनची योजना असलेल्या साठवण तलाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी विहिरींचे उपसे त्वरित बंद करावेत व वीज कनेक्शन तातडीने तोडावे अशी मागणी नगरसेवक मनोहर जावळे, संजय कासार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांकडे केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे 100 एकरांचा असून, त्याची क्षमता 50 दलघफू आहे.सध्या तलावात अडीच दशलक्ष घनफूट साठा आहे. साठवण तलाव परिसरात 108 खासगी विहिरी आहे. या विहिरींना साठवण तलावाच्या पाण्याचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात आहे. पालखेड धरणक्षेत्रात पाऊस नसल्याने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. साठवण तलाव परिसरातील विहिरीतून सर्रास उपसा शेतपिकांसाठी केला जात आहे. त्यामुळे तलावातील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. साठवण तलावावर प्लास्टिक कागदाचे आच्छादन टाकण्याची मागणी मनोहर जावळे यांनी केली आहे.
100 खासगी विहिरींचे कनेक्शन तोडले
- पालिकेने महावितरणला पत्र होते. या पत्रानुसार साठवण तलाव परिसरातील 100 खासगी विहिरींचे खासगी विहिरींचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. खासगी विहिरमालकांनी विजेचा अनधिकृत वापर करून पाणी उपसा केल्यास कारवाई केली जाईल.
गणेश रिछवाल, उपअभियंता, महावितरण