आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झळा कृत्रिम पाणीटंचाईच्या, नागरिकांना घ्यावा लागतोय टँकरचा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांची तृष्णा भागविणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध असताना महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीयांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईच्या झळांचे चटके सहन करावे लागत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, जुने नाशिक या उपनगरांमध्ये अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
दुरुस्तीचे काम अजून झाले नाही का?

गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने काही दिवसांपूर्वीच दुरुस्तीचे काम करण्यात आले. दुरुस्तीदरम्यान दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, त्यानंतर वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. यामुळे सुमारे आठ दिवस या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी घेऊनही समस्या कायम असल्याने दुरुस्तीचे काम अद्याप झाले नाही का, असा सवाल नागरिक विचारत जात आहे.

सिडकोत टंचाईची झळ

सिडको परिसरातील पाथर्डी फाटा, राणेनगर, वासननगर, खुटवडनगर, जाधव संकुल परिसर, डीजीपीनगर, इंद्रनगरी, पवननगर, उपेंद्रनगर या भागांमध्येही कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तक्रारींची दखल घेऊ
उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. काही नागरिक मोटार लावून पाण्याच्या अपव्यय करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अश्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. एन.जे. वाडीले, पाणीपुरवठा विभाग

तक्रारी करूनही दुर्लक्ष

आमच्यासोसायटीत कमी दाबाने पाणी येत असल्याने पाण्याची साठवणूक करता येत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. शीतलबंगाली, परबनगर

२० मिनिट येते पाणी

परबनगर परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असताना केवळ २० ते २५ मिनिटे पाणी येते. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा. अाशावाघ, परबनगर

जलवाहिन्या बदलू

परबनगर येथे काही सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वॉल्व्हमनला योग्य दाबाने पाणी सोडण्याच्या सूचना देवू, तसेच जुन्या पाइपलाइनही बदलण्यात येतील. डॉ.दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

इंदिरानगरात गंभीर समस्या

इंदिरानगर भागातील परबनगर, विनयनगर, कलानगर या परिसरात मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. परबनगरमधील रहिवाशांना तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात दोन-दोन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून रात्री ते १० या वेळेत पाणीपुरवठा होतो. मात्र तो अतिशय कमी दाबाने होत असल्याने पाणी अपुरे पडते. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठवूनही ठेवता येत नाही.

जुने नाशिक परिसरात कमी दाबाने पाणी

जुने नाशिकमधील दूधबाजार परिसरात काही दिवसांपासून जलवाहिनीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नानावली, कथडा परिसर, बागवानपुरा यांसह गंजमाळ भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.