आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसन सुटल्यावर साजरा होतो ‘सोब्रायटी’ वाढदिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकेकाळी दारूच्या आहारी गेलेल्या नाशिकच्या नीलेश राजहंसने स्वत:चे लाइफ रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केले आहे. यात व्यसनाधीन व्यक्तींवर मानसिक उपचार केले जातात. गेल्या पाच वर्षांत या सेंटरमध्ये येऊन अनेकांनी व्यसनांना कायमचेच सोडले. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे सेंटरमध्ये आल्यानंतर व्यसन सोडणार्‍यांचा ‘सोब्रायटी’ वाढदिवस साजरा केला जातो. म्हणजे ज्या दिवशी रुग्ण पूर्ण निर्व्यसनी होतो त्या दिवशी त्याचा नवा जन्म झाला, असे मानण्यात येते. मग त्या तारखेला लाइफ सेंटरचा परिवार एकत्र येऊन त्या रुग्णाचा वाढदिवस साजरा करतो.

नीलेश राजहंसने दारू सोडता-सोडताच डॉ. युसूफ र्मचंट यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची स्वत:ची थेरपी विकसित केली. या थेरपीत प्रेम, स्वातंत्र्य आणि एकमेकांचा आदर, या त्रिसूत्रीचा चपखलपणे वापर करण्यात आला. येणार्‍या रुग्णाला बंदिस्त न करता अथवा डांबून न ठेवता त्यावर मोकळ्या वातावरणात उपचार सुरू झाले. हे उपचार डॉक्टरांनी नव्हे, तर रुग्णांनी स्वत:च केले. नीलेशने त्यांना केवळ आपली थेरपी समजावून सांगितली.

या सेंटरमध्ये दाखल होणार्‍यांसाठी दिनक्रम आखून देण्यात आला आहे. दिनक्रमातील उपक्रम रुग्णाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याबरोबरच त्याच्या पूर्वायुष्याची उजळणी करायला लावतो. एकमेकांच्या नजरेला नजर भिडवून बोलताना या रुग्णांमध्ये आपसूकच आत्मविश्वास वाढतो. नशेवर भाषणबाजी करण्यापेक्षा त्यातून बाहेर कसे यायचे याविषयी बोलणे, वेगवेगळा व्यायाम करणे, गार्डनिंग करणे, एकमेकांशी भरपूर गप्पा मारणे, चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे, प्रार्थना करणे, मेंटल एक्सरसाइज, मूल्यशिक्षण यांसारखे नियम पाळले जातात. नीलेश ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करीत आहेत, त्याला मनोवैज्ञानिक आधार आहे. त्यामुळे या उपचारांचे अपेक्षित परिणामही साधले जात आहेत.