आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट भारी, देखभाल खर्च भारी अन् वादही लई भारी..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाचमजली इमारतीसाठी बिल्डरने लिफ्ट बसवून दिली. देखभालीसाठी बॅँकेत रक्कम जमा करून मासिक व्याजावर लिफ्ट चालेल, अशी तरतूदही करून दिली. मात्र, ही रक्कम व त्यापोटी येणारे व्याज तुटपुंजे असल्यामुळे सध्या अनेक सोसायट्यांमध्ये अतिरिक्त खर्च कोणी उचलायचा, यावरून वाद होत आहे. तळ व पहिल्या मजल्यावरील रहिवासी वापर करीत नाहीत म्हणून लिफ्टचा खर्च देत नाहीत. दुसरीकडे वार्षिक 50 हजारांपर्यंतचा खर्च पाच ते सहा डोक्यांवर येत असल्याने मासिक पाच हजारांचा बोजा पडत असून, दुरुस्तीकडे काणाडोळा होत असल्याचे रहिवासीच सांगत आहेत.

2010 मध्ये 15 मीटरपेक्षा उंच इमारतींना लिफ्ट बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर अनेक इमारतींमध्ये लिफ्ट बसवली गेली. त्यात विकसकाने इमारत पूर्ण करून त्यात साधारण तीन ते पाच लाखांपर्यंतची लिफ्ट बसवून दिली. वीज व देखभालीचा खर्च सोडवण्यासाठी एकरकमी 50 हजार घेतले. एका इमारतीत बारा ते पंधरा रहिवाशांचा विचार केला, तर हीच रक्कम सात लाखांपर्यंत जाते. व्याजाचा विचार केला तर मासिक तीन हजार हातात पडतात. यातून जेमतेम वीजखर्चच भागतो. वार्षिक देखभालीपोटी होणार्‍या 50 हजारांचा हिशेब जुळत नाही. त्यात देखभालीवर अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आली की, तळ व पहिल्या मजल्यावरील रहिवासी सरळ नकार देतात. त्यामुळे अनेक ठिकाणी लिफ्ट बंद पडली तर चालेल, मात्र दुरुस्तीकडे काणाडोळा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. अतिरिक्त पैसे काढून देखभालीचा विचार केला तर मासिक तीन ते चार हजारांचा बोजा पडत असल्यामुळे दुर्लक्ष होत आहे.
लिफ्ट म्हणजे पांढरा हत्ती
माझ्या इमारतीत आठ फ्लॅट आहेत. लिफ्टच्या देखभालीसाठी गतवर्षी 60 हजार रुपये भरले. प्रत्येकी आठ हजार खर्च आला. विजेपोटी वेगळा खर्च येतो. जनरेटर नसल्यामुळे लोकांना अनेक वेळा अडकून पडावे लागते. जनरेटरचा खर्च करण्यासाठी रहिवासी तयार होत नाहीत. चेतन ब्राrाणकर, रहिवासी, इंदिरानगर

देखभालीवरून वाद
माझ्या इमारतीत केवळ सहाच लोक राहतात. वार्षिक खर्च 40 ते 50 हजारांपर्यंत जातो. त्यात ज्यांना वापर होत नाही त्यांच्यावरही बोजा पडतो. देखभालीवरून रहिवाशांमध्ये अनेकदा वादही उद्भवतात. लिफ्टची देखभाल नियमित झाली तर धोका टळू शकेल. स्मिता पाटोदकर, रहिवासी, तिडके कॉलनी

असा आहे साधारण खर्च
15 ते 50 हजार : वार्षिक देखभाल-दुरुस्ती (लिफ्टच्या प्रकारानुसार)
12 ते 15 हजार : विजेपोटी येणारा वार्षिक खर्च (वापराप्रमाणे)
3 ते 25 हजारांपर्यंत : सुटे भाग बदलणे (प्रकार व दर्जानुसार)