आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील लिफ्टलाही घरघर , 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खासगी लिफ्टच्या धोकादायक वापरावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकला असताना, संपूर्ण शहरातील इमारतींवर ज्यांचे नियंत्रण असते त्या महापालिकेतील पाच लिफ्टचे आयुर्मान संपुष्टात आल्याची बाब समोर आली आहे. यातील दोन लिफ्टने मान टाकली असून, तीन लिफ्टचा कसाबसा दुरुस्त करून वापर सुरू आहे. या लिफ्टमध्ये सामान्यांपासून तर व्हीआयपी पुढारी व अधिकार्‍यांचाही वावर असतो. असे असूनही मृत्यूला आमंत्रण देण्याच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

1992 मध्ये राजीव गांधी भवनची निर्मिती झाल्यावर पाच लिफ्ट बसवण्यात आल्या. यात प्रवेशद्वारापासून तर नगररचना विभागाकडे जाण्यासाठी दोन लिफ्ट बसवण्यात आल्या. एक लिफ्ट आयुक्त कार्यालयासमोरून पाणीपुरवठा विभागाकडे जाते. दुसरी लिफ्ट विद्युत विभागाकडून लेखापरीक्षण विभागाकडे जाते, तर एक लिफ्ट उपआयुक्त कार्यालयापासून वैद्यकीय विभागाकडे जाते. यात नगररचना व वैद्यकीय विभागाकडे जाणार्‍या लिफ्ट बंद पडल्या आहेत. उर्वरित तीन लिफ्टचा वापर सुरू असला तरी अनेकदा त्या अडकण्याचेही प्रकार घडतात. विद्युत विभागातील सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, लिफ्ट कालबाह्य व जुन्या पद्धतीच्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक वेळा त्यात लोक अडकून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्या कंपनीने लिफ्ट बसवली, त्यांच्याकडेच दुरुस्तीचा ठेका आहे. मात्र, या कंपनीचा कारभार मोठा असल्यामुळे लिफ्ट दुरुस्तीसाठी वारंवार संपर्क केल्यावर सुविधा मिळत आहे.