आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅब्रिकेशन वर्कशॉपचा मालक झाला वेटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहणार्‍या अजय कुलकर्णी यांना अल्पवयातच दारूचे व्यसन लागले. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, वेटर होण्याची पाळी आली. वेळीच सावरत केअर टेकर झालेल्या तरुणाची कथा त्याच्याच शब्दांत..

स्वत:ला सावरत इतरांनाही दाखवला चांगला मार्ग
मी मूळचा जळगावचा. वयाच्या सोळाव्या वर्षी महाजनवाडीत मित्रांसमवेत सर्वप्रथम ‘बसलो’. तेथे जिन्यातच पहिल्यांदा दारूची चव चाखली. सुरुवातीला कडू वाटली; पण काही काळानंतर हा कडवटपणाच हवाहवासा वाटू लागला. अर्थात, उमेदीच्या काळात मी स्वत: कष्ट करून फॅब्रिकेशनचे वर्कशॉप सुरू केले होते. शून्यातून सारे उभारले होते. मात्र, दारूच्या नशेने या सर्व कष्टांवर पाणी फिरवले. व्यवहारात चुका वाढल्याने अखेर वर्कशॉप बंद करावे लागले. आई-बाबांचे ऐकत नसल्याने त्यांनी मला 1999 मध्ये नाशिकला सातपूरमधील बहिणीकडे पाठवले. येथे एका खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकार्‍याचे काम करू लागलो. परंतु, दारू काही पिच्छा सोडेना. येथेही मी तिच्या नादी लागलो. नोकर्‍यांवर नोकर्‍या सोडल्या. कंपनीत वेल्डर म्हणूनही काम केले. पण, सुटी मिळाली नाही तर नोकरी सोडून मोकळा व्हायचो. अर्थात मनसोक्त पिण्यासाठीच मला सुटी हवी असायची.

जुलै 2011च्या सुमारास बाबा अत्यवस्थ झाले. त्यांना मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, मी लाज कोळून प्यालो होतो. तशा अवस्थेतही बाबांकडून पैसे घ्यायचो आणि त्याची दारू प्यायचो. काही दिवसांनी बाबा देवाघरी गेले. मी पुन्हा बहिणीकडे आलो. आता खिशात पैसा नसायचा. त्यामुळे मी बारमध्येच कामाला लागलो. पडेल ते काम करायचो. कधी झाडू मारायचो, तर कधी वेटर म्हणून काम करायचो. त्या बदल्यात मला दारू मिळायची. फॅब्रिकेशन वर्कशॉपचा मालक एव्हाना वेटर झाला होता. त्याचवेळी मी वेल्डिंगचीही छोटी-मोठी कामे करायचो. मात्र, दारू न पिता वेल्डिंग करताच येत नव्हती. हातापायांचा कंप व्हायचा. एकदा वेल्डिंग करताना डोळ्याला गंभीर दुखापत झाली. उपचार करण्यासाठी कोणी पैसेही देत नव्हते. फुकट दारू मिळत होती; पण उपचारासाठी पैसे मिळत नव्हते. बहिणीच्याही सहनशक्तीचा अंत झाला होता. तिने मला हात जोडले. त्याच वेळी तिच्या सासूबाईंनी माझ्या हातात ‘दिव्य मराठी’ पेपरचा अंक टेकवला. त्यात नाशिकमधील लाइफ रिहॅबिटेशन सेंटरची माहिती प्रसिद्ध झाली होती. ती वाचून तेथे गेलो. त्यांनी सांगितले ते केले. आज दारू पूर्णत: सुटलीय. याच सेंटरमध्ये आता मी केअरटेकरचं काम करतोय.