आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - गुजरातमधील प्रथितयश व्यापारी असलेल्या जयेश ठक्कर यांना वयाच्या सोळाव्या वर्षीच मद्य प्राशनाचे व्यसन जडले. बरोबरचे मित्रही नशेबाज असल्याने त्यांचे व्यसन वाढत गेले. त्यात चरस व गांजा या व्यसनांची भर पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला तरी त्यांचे व्यसन सुटले नाही. पुढे अनेक घटना घडत त्यांना एका प्रकरणात कारावास झाला. तेथून बाहेर पडल्यानंतरही व्यसन कायम राहिल्याने घरच्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना नाशिकच्या लाइफ सेंटरमध्ये दाखल केले. याठिकाणी त्यांनी व्यसनमुक्ती साधली. व्यसनमुक्तीचा हा लढा जयेश यांच्याच शब्दात..
गुजरातमधील प्रथितयश व्यापारी. पेट्रोलपंपाचा माझा व्यवसाय. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये सर्रास विकल्या जाणार्या मद्याचा मीदेखील एकेकाळचा लाभार्थी. वयाच्या सतराव्या वर्षापासूनच मी मद्य प्राशनाला सुरुवात केली. माझी मित्रकंपनीच अशी होती की, तेथे कोणीही निर्व्यसनी राहू शकत नव्हते. खिशात पैसा असल्याने नशेबाजी वाढत गेली. काही दिवसांनी ही नशा चरस आणि गांजापर्यंत जाऊन पोहोचली. त्या नशेतच आमचा दिवस जाऊ लागला. याच काळात माझा विवाह झाला. पण, नशेने सोबत सोडली नाही. याच नशेने नैतिक आणि अनैतिकतेच्या सीमारेषा पुसून टाकल्या. परिणामत: पेट्रोल भेसळीत मला पोलिसांनी अटक केली आणि वर्षभर कारावासाची शिक्षा जुनागढ कारागृहात मी भोगली. याच काळात छानशा परीने माझ्या घरी जन्म घेतला होता. जन्मानंतर तिचा चेहरा मला तीन महिन्यांनी पाहायला मिळाला. पण, तिच्या निरागस चेहर्यानेही माझ्यातला नशेचा हैवान मारला गेला नाही. गांजा ओढण्याची सवय वाढतच गेली. घरच्यांनी पैसे देणे बंद केले. माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी मला बसायला बंदी घातली. त्यापायी उधारीही वाढली. घरात खटके उडू लागले. पत्नी माझ्याशी बोलेनासी झाली. मुलंही माझ्याकडे पाठ फिरवू लागले. मी नाराज झालो. पण, मार्ग दिसत नव्हता. त्याच काळात नाशिकच्या लाइफ सेंटरचा पत्ता कुणीतरी माझ्या भावाला दिला. येथे आम्ही आलो. मला सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बघता-बघता काही काळात मी रमत गेलो. आज सहा महिने झाले मी दारू प्यालो नाही की गांजा ओढला नाही. तो आता ओढावा असे मला आता वाटत नाही. आता पत्नी माझ्याबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारते. मुलांनाही माझी ओढ वाटू लागली आहे. या दारूने आणि गांजाने माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस मी वाया घालवलेत. ते आता पुन्हा कधीच मिळणार नाहीत; पण आताचे जे सुखाचे दिवस मी अनुभवतो ते केवळ नशा सोडल्यामुळेच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.