आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचे फाेटाे असलेल्या रुग्णवाहिकेत मद्यसाठा, नाशिकमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई सुरू अाहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यात निर्मित सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मद्यसाठा  एका रुग्णवाहिकेतून जप्त केला. 
 
शुक्रवारी (दि. १७) सकाळी ६.३० वाजता गोविंदनगर, इंदिरानगर बोगदा येथे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे जप्त करण्यात अालेल्या रुग्णवाहिकेवर भाजप, मनसे, शिवसेना अशा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फाेटाे अाहेत. हा मद्यसाठा नेमका कुठल्या पक्षासाठी आणण्यात आला होता, याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दरम्यान, वाहनचालकास अटक करण्यात 
अाली अाहे.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे. विभागाचे पथक रात्री शहरात गस्त करत असताना गोविंदनगर येथून रुग्णवाहिका (एमएच १५ इएफ ७२२) सायरन वाजवत जात हाेती.  पथकाने या रुग्णवाहिकेस  रस्ता दिला.  
 
मात्र इंदिरानगर बोगदा येथे गाडीचा वेग कमी झाला तेव्हा या रुग्णवाहिकेत चालकाशिवाय कुणी नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी रुग्णवाहिका थांबवली. झडती घेतली असता अात दारूचा साठा अाढळून अाला. २६ बॉक्समध्ये दादरा-नगर हवेली येथे उत्पादन केलेल्या दारूच्या बाटल्या सापडल्या. राज्यात या मद्यसाठ्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये अाहे.  रुग्णवाहिका चालक अमिताभ मधुकर शार्दूल याला अटक करण्यात अाली असून त्याच्याविराेधात महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

रुग्णवाहिकेबाबत संभ्रम   
पकडलेल्या रुग्णवाहिकेवर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल,  आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप यांच्यासह धुळे येथील आमदार अनिल गोटे, महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक सतीश सोनवणे, लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते यांचे फाेटाे अाहेत. तसेच दिंडोरी रोड येथील शहा हॉस्पिटलचे नाव तसेच दक्ष पोलिस टाइम्स आणि युनिक ग्रुपचेही नाव असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही रुग्णवाहिका नेमकी कुणाची, याबाबत संभ्रम असल्याचेही विभागाने स्पष्ट केले. 
 
अवैध मद्याची माहिती अाम्हाला द्यावी
रुग्णवाहिकेतून अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. रुग्णवाहिका चालकास अटक करण्यात आली आहे. रुग्णवाहिका मालकाचा शोध सुरू आहे. शहर व जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यसाठा विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. तत्काळ कारवाई केली जाईल - प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग. 
बातम्या आणखी आहेत...