आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटीचा मद्यसाठा वर्षात जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत सुमारे दीड कोटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एक हजार 572 गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यात 830 संशयितांना अटक करण्यात आली आहे. गत वर्षाच्या तुलनेत सुमारे 45 लाखांचा अधिक मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जे. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध मद्याचा साठा व वाहतूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यात आली. विभागाकडून शहरासह जिल्हा व राज्यमार्गाच्या सीमा, आदिवसी वस्ती व पाड्यांवर गावठी मद्यनिर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. विशेष पथकांद्वारे हॉटेल्स, ढाबे, विनापरवाना मद्यविक्री करणारे परमिट रूम, बीअर बारची तपासणी करण्यात येत आहे. वर्षभरात विभागाने एक हजार 572 गुन्हे नोंदविले असून, त्यात 830 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत एक कोटी 41 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या कारवाईत तब्बल 150हून अधिक गुन्हे दाखल होऊन, अधिक साठा जप्त करण्यात आला. गेल्या आठवडाभरापासून नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विशेष सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. गत पंधरवड्यात पथकांनी 120 ठिकाणी छापे टाकले असता 87 जणांना अटक करण्यात आली. त्यात पाच वाहनांसह आठ लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, शहर व जिल्ह्यात विशेष तपासणी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला असून, महिनाभर छापे सुरू ठेवले जाणार असल्याचे समजते.