आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Literature Anil Avahat Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजूनही महाकादंबरी निर्मितीची प्रतीक्षाच, सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इतर भाषांतील साहित्यासारखी मराठी साहित्यात ती ताकद अपवादानेच सापडते, याची खंत वाटते. मात्र तसे उत्तम साहित्य निर्मितीची सुरुवात झाली आहे, पण महाकादंबरी अजून यायची आहे. मी त्याच प्रतीक्षेत असल्याचे मत साहित्यिक अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
सावानाच्या 47 व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. साहित्य केवळ रंजन नव्हे, त्यात रंजन असावेच, पण त्यातून जीवनाचा गाभा प्रतिबिंबित व्हावा, जीवनदर्शन व्हावे, जगायचे कसे याची दिशा देणारे साहित्य असावे. मराठी साहित्यात सध्या मात्र तसे दिसत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. साच आणि रसाळ तितुके आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृतांचे...
या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांनी त्यांनी ह्यसाहित्यावर बोलू काहीह्ण या विषयाला सुरुवात केली. साहित्य निर्मितीचे स्थित्यंतर सांगताना त्यांनी मानव निर्मितीपासूनची अनेक उदाहरणे दिली. आपल्याला जे माहीत आहे ते सांगितल्याशिवाय राहवत नाही. ते साहित्यातून व्यक्त होते. प्राण्यांमध्ये निर्मितीशीलता नाही, त्यांची भाषा मर्यादित आहे. माणसाची भाषा प्रगल्भ आहे. त्याला निर्मितीचे वरदान आहे.
शब्द, चित्र, शिल्प यातून नवीन काही तरी व्यक्त होत असते. एकाचा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी लिखाणाचे माध्यम घेतो आणि साहित्यनिर्मिती होते. पण ही निर्मिती होत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची संवेदना, हृदयस्पर्शी घटना यांचे अर्थ प्रगट झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.
पूर्वी फडके आणि खांडेकरांच्या पुढे साहित्य जात नव्हते. पण 1960 सालानंतर बदल होत साहित्यजाणिवा बदलत गेल्या. तरीही दलितांवरील चांगली सर्वसमावेशक कादंबरी अद्यापही वाचायला मिळाली नाही. आपल्यासारखे संवेदनशील रसिक त्याची वाट बघतात. आपले जीवन मध्यमवर्गाच्या चौकटीत बांधले गेले आहे. ते बरेच अनुकरणीय झाले आहे. पण शहरे अनुकरण करण्यालायक नाहीत. आपल्या संस्कृतीचे प्रश्न साहित्यात येतात का, या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. साहित्यात सामाजिकता आलीच पाहिजे असे नाही, पण त्याचे संस्कृतीपुढील प्रश्नाचे प्रतिबिंब पडेल असे साहित्य बघायला मिळत नाही.
अवचट म्हणाले...
अनुभवांचे आदान-प्रदान म्हणजेच साहित्य. पूर्वीच्या साहित्यात निसर्ग रसरशीत आलेला दिसत नाही. ती खरी परिस्थिती होती, सत्यता, संवेदना होती. पण आपला सह्याद्री साहित्यात कधीच आला नाही.संस्कृतीचे वस्त्र रक्ताने डागाळले आहे. म्हणूनच आता माणूस युद्धापर्यंत जाऊन पोहोचला. आताची संस्कृती माणसाला गिळायलाच बसली आहे.जाहिरातींमुळे कल्पक माणसाचे रूपांतर एका गि-हाइकात झाले आहे. माणसाचे अंधानुकरण होत आहे. माणसाने अतिउत्साहाने स्वतचेच नुकसान करून घेतल्याचे चित्र आहे. कोणतेही पुस्तक वाचणे लेखकाबरोबरच वाचकाने केलेली साहित्याची सहनिर्मितीच आहे. जे शब्द बोलीमध्ये नाही, ते लिखाणात असावेच कशाला? अपल्या मातृभाषेतून संस्कृतीचे दर्शन होत असते. एका संस्कृतीशी चांगले भरण-पोषण झाले तर दुसरी संस्कृती आपण आत्मसात करू शकतो.