नाशिक - येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे मानाचा 2014चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर यांना सोमवारी जाहीर झाला. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी ही घोषणा केली. येत्या 7 मार्चला कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथे सायंकाळी 6 वाजता विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नटसम्राटच्या प्रवेशांचे सादरीकरण
पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून कुसुमाग्रज अध्यासनातर्फे वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ नाटकातील निवडक नाट्य प्रवेशांचे सादरीकरण होणार आहे. पुण्याची नाट्यरंजन कला अकादमी हा प्रयोग सादर करणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात शनिवार, दि. 8 मार्च रोजी दुपारी 3 वाजता हा प्रयोग होणार असून, तो सर्वांसाठी खुला राहील.
जीवनावर ठसा उमटवणारे आणि सर्जनशील लेखन करणारे डॉ. पातर नामवंत राष्ट्रीय साहित्यिक आहेत. पंजाबीतील ज्येष्ठ कवी, नाटककार, लेखक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. निवड समितीत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील, लोकवाड्मयगृह प्रकाशनचे संपादक सतीश काळसेकर आणि कवी डॉ. दिलीप धोंडगे यांचा समावेश होता.
पातर यांची साहित्य संपदा
हवा विच लिखे हर्फ, बिर्ख अर्ज करे, हनेरे विच सुलगदी वर्णमाला हे नावाजलेले कवितासंग्रह.
अग दे कलीरे, सैयानी मै अंतहीन तकार्ळा, हुक्मी दी हवेली, शहर मेरे दी पागल औरत ही पंजाबी भाषेत त्यांनी रूपांतरित केलेली नाटके गाजली आहेत.