आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांच्या हंगामात भारनियमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - गोंदियातील अदानी वीजनिर्मिती केंद्रातील दोन संच बंद पडण्याबरोबरच सिपत-बिलासपूर वाहिनीत बिघाड झाल्याने राज्यात आकस्मिकरीत्या एक हजार 600 मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. बारावीच्या परीक्षांना आजपासूनच सुरुवात झाली असताना, ऐन परीक्षांच्या हंगामात राज्यात भारनियमन सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येही चिंता वाढली आहे. दरम्यान, संच व वाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘महावितरण’च्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. बुधवारी 765 किलोवॉट क्षमतेच्या सिपत-बिलासपूर वाहिनीत बिघाड झाल्याने केंद्रीय ग्रीडमधून उपलब्ध होणारी वीज मिळवण्यास महावितरणला अडचणी निर्माण झाल्या. सुमारे 500 मेगावॉटचा तुटवडा भरून काढण्यासाठी तातडीचे भारनियमन करणे भाग पडले. त्यामुळे 1 ते 4 तासांचे भारनियमन झाले. काही प्रमाणात तूट भरून काढल्याने सायंकाळपर्यंत स्थितीत सुधारणा झाली.

एक हजार 670 मेगावॉटची तूट
स्थितीत सुधारणा होत असतानाच गुरुवारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाच्या अदानी वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॉट क्षमतेच्या दोन संचात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे एक हजार 320 मेगावॉट विजेचा अचानक तुटवडा निर्माण झाला. शिपत-बिलासपूर वाहिनीतील बिघाडामुळे गुरुवारी दुसर्‍या दिवशीही केंद्रीय ग्रीडमधून 350 मेगावॉट वीज राज्याला मिळू शकली नाही. त्यामुळे एकूण एक हजार 670 मेगावॉटची तूट निर्माण झाली. राज्याला गुरुवारी 15 हजार मेगावॉटची गरज होती. त्यातच एक हजार 670 मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने भारनियमनाचे संकट ओढवले.

भारनियमनाने नुकसान
उद्योग क्षेत्र वगळून किमान 1 ते 4 तासांचे भारनियमन झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. अ, ब, क व ड र्शेणीत असलेल्या फीडरवर भारनियमन केले जात नाही. परंतु, तेथेही भारनियमन करण्यात आले. फ्रीक्वेन्सी कमी मिळत असल्याने भारनियमन होत असल्याची माहिती स्थानिक महावितरण कार्यालयातून दिली जात होती.

दुरुस्तीचे प्रयत्न
अदानी केंद्रातील बंद पडलेले वीजनिर्मिती संच व सिपत-बिलासपूर वाहिनीतील बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे स्थितीत लवकरच सुधारणा होईल. वैदेही मोरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण