आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनातारण कर्ज देण्याचा फंडा; लाखोंना गंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशासाठी ग्राहकांची हतबलता ओळखून विनातारण व विनाकागदपत्रे कर्ज मिळवा अशी जाहिरातबाजी करून गंडा घालणारी मोठी टोळी शहरात कार्यरत झाली असून, खुलेआम जाहिराती करून लुटणार्‍या टोळीला वेसण घालण्यात पोलिस यंत्रणा व सहकार खात्याच्या मुखंडांना मात्र अपयश आले आहे. तक्रार येण्याची वाट बघण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने बनावट ग्राहक बनून टोळीला वेसण घालणे शक्य असतानाही त्या पर्यायाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे फसवणुकीबाबत तक्रारी दाखल झाल्यावर गुन्हा दाखल न करता तपासाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्यामुळे टोळीचे फावले आहे. बेरोजगार व सामान्यांना गंडा घालणार्‍यांच्या गोरखधंद्यावर डीबी स्टारचा प्रकाशझोत..

खुलेआम जाहिराती; होते गुंग मती
ग्राहकांना जाळ्यात अडकवण्यासाठी साधे तंत्र वापरले जात आहे. वर्तमानपत्रात जाहिराती देणे, मध्यवर्ती ठिकाणी फलक लावणे, प्रसिद्धीपत्रके वाटप करणे, मोबाइलद्वारे संदेश पाठवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. विनातारण, विना कागदपत्रे कर्ज मिळवा, घरबसल्या करोडपती व्हा, महिला बचतगट-बेरोजगारांना सामाजिक संस्थेकडून कर्ज आणि नोकरी याप्रकाराचे आमिष दाखवित लाखोंना गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याऐवजी तक्रार अर्जावर बोळवण केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच पोलिसांकडूनच तपास केला जात नसल्याने काही तक्रारदारांना थेट गृहमंत्रालयाकडे दाद मागण्याशिवाय पर्यायच नाही.

घटना क्र. 1
70 हजारांची फसवणूक

एका वर्तमानपत्रात दररोज ‘विनातारण उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवा’ अशी जाहिरात बघून संपर्क साधला. जाहिरातीत आदित्य गुप्ता, प्रो. प्रा. बालाजी ग्रुप, के. एस. गार्डन लालबाग, बंगलोर, मोबाइल नं-08398096306 व जानकीदास गुप्ता, बंगलोर, मोबा. 9540287235 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मिळाली. मोबाइलवर चौकशी केली असता कंपनीकडून एसएमएस प्राप्त झाला. तुमचे कर्ज मंजूर झाले असून, तातडीने बॅँकेचे खाते क्रमांक, पॅनकार्ड, दोन फोटो एसएमएसवर दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यास सांगितले. कंपनीकडूनही कागदपत्रे मिळाले असून, कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क स्टेट बॅँकेच्या 32856491316 खाते क्रमांकावर जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला 4500, त्यानंतर 11 हजार, 7 हजार 200, 23 मे 2013 रोजी पुन्हा 12 हजाराची रक्कम जमा करण्यास सांगितले. मोबाइलवर चेक नंबर देऊन तुम्हाला 2 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले. आठवडाभरात बॅँकेच्या खात्यात चेक जमा केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार बॅँक ऑफ महाराष्ट्र, अंबड शाखेत सलग दहा ते बारा दिवस जाऊन चौकशी केल्यावर चेक जमा झालेला नाही. त्यानंतर मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता क्रमांकच बंद आढळून आला. सुमारे 70 हजाराला गंडा घातला. या कंपनीने दिलेल्या पत्त्यावर बंगलोर येथे प्रत्यक्ष गेलो असता पाइपचे दुकान आढळून आले. दरम्यान, संबंधितांनी दिलेल्या खातेक्रमांकाची चौकशी केली असता राहुल शर्मा रा. फतेहबाद हरियाणा यांचे नाव निष्पन्न झाले. पोलिस आयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा व अंबड, भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नाही. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलिस ठाण्यात चकरा मारल्या जात आहेत. भरत आहेर, शिवाजीनगर, गजपंथ

घटना क्र. 2
लाखोंना गंडा

बचतगट आणि व्यवसायासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची जाहिरात वाचून ठक्कर बझार येथील साईप्रसाद मल्टी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला. याठिकाणी कंपनीचे संचालक संशयित समाधान उत्तम पगार यांनी आपल्यादेखत काही महिलांकडून प्रत्येकी 5500 रुपये घेत त्यांना महिन्याभरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आपल्याला वीज कंपनीत कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे सांगून 15 हजार रुपये घेतले. या मोबदल्यात आपल्याला कंपनीची अधिकृत पावतीही दिली. मात्र, त्यांच्याकडे महिन्याभरात चार वेळा संपर्क साधला असता वेळोवेळी पुढच्या तारखा देत होते. त्यानंतर गेल्याच आठवड्यात कार्यालयात गेलो असता कार्यालयाला कुलूप ठोकून पसार झाल्याचे आढळून आले. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. राहुल राजोळे, बेरोजगार

थेट प्रश्न
पंकज डहाणे, सहायक आयुक्त, गुन्हाशोध पथक


* अशाप्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होते का?
- नाही. सुरुवातीला कंपनी अथवा व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यांना प्राप्त झाल्यास अर्जाची सखोल चौकशी करून त्यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यास गुन्हे दाखल केले जातात. मात्र, काही तक्रार अर्जात पुरेशी माहिती अथवा फसवणूक झाल्याचे काही पुरावे नसल्याने गुन्हे दाखल करण्यात अडचणी येतात.

* तक्रारदाराकडून पुरावे देऊनही दुर्लक्ष होते का?
- पुराव्यांची तपासणी करून तातडीने गुन्हे दाखल केले जातात. आडगाव, उपनगर, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे उघडकीस आले आहे. उपनगर येथील आहेर यांच्या फिर्यादीनुसार दीड लाखांना गंडविल्याचा प्रकार लक्षात येताच तपासाची सूत्रे फिरवित संबंधितांचे खाते सील करण्यात आले आहे.

* आर्थिक गुन्हे शाखेकडे किती गुन्हे प्रलंबित आहेत?
- फसवणुकीचे सर्वच गुन्हे आर्थिक शाखेकडे वर्ग होत नसून, पोलिस ठाण्याकडूनच तपास केला जातो. फसवणुकीचा प्रकार, त्यातील रक्कम, संस्था व धागेदोरे लक्षात घेऊन गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग होतो. सध्या 13 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यात ‘विकल्प’च्या फसवणुकीचा समावेश आहे.