आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: नोकरदार-ठेकेदार नातलग बनले नवे सावकार; व्याजाने पैसे देणाऱ्यांचा तगादा नेतो फासाजवळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे बँका किंवा खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापेक्षा कुटुंबातील नातलगांकडून घेतलेली कर्जे आणि साचलेली उधारी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष दिल्लीच्या शिव नाडर विद्यापीठाच्या संशोधकांनी रिझर्व्ह बँकेसाठी केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे.
 
बँकांची कर्जे थकल्यानंतर तसेच खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीनंतर नातलगांकडून शेतकरी घेत असलेल्या अनौपचारिक कर्जाचे प्रमाण वाढले असून, कुटुंबातील नोकरदार, ठेकेदार आणि आडते यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीमुळे होणारी सामाजिक मानहानी हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील तत्कालीन कारण असल्याचे या अभ्यासात सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पंजाबमधील संगरूर या दोन जिल्ह्यांत हा अभ्यास झाला, त्याचा अहवाल नुकताच रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात आला. शेती अर्थतज्ज्ञ प्रा. अजय दांडेकर आणि प्रा. श्रीदीप भट्टाचार्य या संशोधक द्वयींनी या दोन्ही जिल्ह्यांतील गेल्या १५ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला आहे.
 
देशात १९९५ ते २०१५ या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या  यवतमाळ व संगरूर या दोन जिल्ह्यांत झाल्या आहेत. या वीस वर्षांत यवतमाळमध्ये २,६७८, तर संगरूरमध्ये २,२१३ शेतकरी आत्महत्या झाल्या अाहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा अभ्यास यात करण्यात आला. यात पीक पद्धती, त्यांच्याकडील कर्जाची थकबाकी, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न व खर्च याचा अभ्यास केला असता, कौटुंबिक नातलगांकडून घेतलेल्या अनौपचारिक कर्जाची थकबाकी हे आत्महत्यांमागील तत्कालीन कारण असल्याचे पुढे आले. ‘औपचारिक पतपुरवठ्याची यंत्रणा पुरेशी नसल्याने पारंपरिक सावकारी व्यवसायाशी संबंधित नसलेले अनेक जण मोठ्या संख्येने सावकारीच्या व्यवसायात उतरल्याचे दिसते,’ असे निरीक्षण यात नोंदवण्यात आले आहे. कधी ऐन पेरण्यांच्या काळात पावसाने मारलेली दडी, तर कधी पीक कापणीला आले असता झालेली अतिवृष्टी यांसारख्या सलग तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर अल्प भूधारक शेतकऱ्यास बँकांसारख्या औपचारिक संस्थांमधून होणारा कर्जपुरवठा बंद होतो.

अशा वेळी बहुतांश शेतकरी नात्यातील मंडळींकडून व्याजाने पैसे घेतात. पुढे त्यांची परतफेड न झाल्यास चारचौघांत होणारी नालस्ती, कुटुंबाअंतर्गत वाटणारा अपमान व त्यातून तीव्र झालेली निराशा हे आत्महत्यांमागील महत्त्वाचे कारण असल्याचे हा अभ्यास मांडतो. बँका आणि खासगी सावकारांपेक्षा नातलगांकडून घेतलेल्या कर्जाचा तगादा अधिक असल्याचेही यातून पुढे आले आहे. कुटुंबातील ही थकबाकी पुढे शेतकऱ्यासाठी सामाजिक कलंक ठरल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यात पत्नीच्या माहेरच्यांकडून घेतलेले कर्ज फेडता न येणे शेतकऱ्यासाठी अधिक लज्जास्पद, अपमानकारक आणि क्लेशदायक ठरत असल्याचे  आढळले. खासगी सावकारीविरोधातील कायद्याच्या कडक कारवाईनंतर नोकरदार, ठेकेदार किंवा आडते मोठ्या प्रमाणात व्याजाने पैसे देण्याच्या व्यवसायात उतरले असून नात्यातील या नव्या सावकारांच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांवरील दबाव आणि त्यांची कुचंबणा वाढत असल्याच्या नोंदी या अभ्यासात करण्यात आल्या आहेत.  

आत्महत्येची कारणे
- खत, बियाणे, वीज, पाणीपुरवठा यासह पिकाच्या उत्पादन खर्चातील वाढ, सदोष पीक पद्धती आणि लग्न, आजारपण, वाहन खरेदी इत्यादी बिगर शेतकी कारणांसाठीचा भरमसाट खर्च ही शेतकरी आत्महत्यांची याआधीही पुढे आलेली कारणे या अभ्यासातही अधोरेखित झाली आहेत.  
- महाराष्ट्राच्या यवतमाळमधील सर्वाधिक आत्महत्या कापसाच्या मशागतीच्या काळात
- अल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी अधिक  बिगर शेती उत्पन्नाची साधने नसलेली कुटुंबे  
- पंजाबच्या संगरूरमधील किशनगड गावात (मलेरकोटला तालुका) ७९ केसेस  
- भाड्याने जमीन कसण्यासाठी घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक  
- अतिवृष्टीमुळे खरिपातील भाताचे नुकसान  

यवतमाळ  व  संगरूर (पंजाब) जिल्ह्यांचा निष्कर्ष
- पारंपरिक सावकारांपेक्षा नव्याने सावकारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले  
- कुटुंबातील नातलगांकडून घेतलेल्या उसनवारीचे प्रमाण अधिक  
- खासगी सावकारी-विरोधातील कायद्यानंतर सावकार सावध  
- नोकरदार किंवा ठेकेदार नातलग बनले नवे सावकार  
- कुटुंबातील थकबाकी अधिक लाजिरवाणी आणि अपमानास्पद  
- बँका आणि सावकारांच्या तगाद्यापेक्षा नातलगांचा तगादा लज्जास्पद  
- सार्वजनिक मानहानीमुळे सामाजिक वैफल्य आणि निराशा  
- सदोष पीक पद्धती आणि वाढता उत्पादन खर्च  
- लग्न, आजारपण, वाहन, मोबाइल खरेदी हा वाढता बिगर शेती खर्च  

या आहेत सुचवलेल्या उपाययोजना
- पीक पद्धतीत बदल, एक पीक पद्धतीकडून मिश्र पीक पद्धती  
- पीक कर्जाऐवजी जमीनधारणेनुसार कर्जाचे वाटप  
- अल्प मुदतीऐवजी दीर्घ मुदतीचे पीक कर्ज
 
बातम्या आणखी आहेत...