आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

21 फेब्रुवारीला व्यवसाय बंद; व्यापारी जाणार इशारा सभेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्था करातून (एलबीटी) छळवणूक होत असल्याने राज्य सरकारला ‘नो एलबीटी-नो ऑक्ट्रॉय’चा इशारा देण्यासाठी व्यापार्‍यांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर सभा होत आहे. या सभेला शहरातील सर्व व्यापार्‍यांना उपस्थित राहाता यावे, याकरिता या दिवशी शहरातील व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक व्यापारी महासंघाने घेतला आहे.


फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी रात्री नाशिकरोडच्या जैन भवन येथे झालेल्या व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यवसाय बंदचा निर्णय घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, घाऊक किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, महानगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजन दलवानी, अशोक तापडीया, विजय चोरडीया, नेमिचंद कोचर आदी व्यापारी नेते व्यासपीठावर होते. एलबीटी कर हटविला नाही तर निवडणुकीत जागा दाखवू, हा इशारा सरकारला देण्यासाठी सभा आयोजित केल्याचे गुरुनानी यांनी स्पष्ट केले. या वेळी राहुल डागा, परेश बोधानी, मनोज वढेरा, मदन पारेख, पवन लोढा, प्रमोद छाजेड, किशोर ललवाणी यांसह व्यापारी उपस्थित होते.


गरवारे पॉइंट येथून निघणार
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता गरवारे पॉइंट येथे शहरातील 27 व्यापारी संघटनांची वाहने जमतील. तेथेच धुळे, मालेगाव येथील वाहनेही येतील व एकत्रितरीत्या ते मुंबईकडे जातील.


डाव्या आघाडीकडूनही विचारणा
व्यापार्‍यांच्या ‘नो एलबीटी-नो ऑक्ट्रॉय’ या मागणीला पाठिंबा देण्यासाठी रविवारी डाव्या आघाडीतील पक्षांनीही विचारणा केली असून, लेखी आश्वासन आम्ही मागितले असल्याचे प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.