आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

दिंडोरीतील प्रचारापासून डॉ. गावित राहणार दूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कन्येसाठी राष्ट्रवादीला रामराम करणार्‍या ज्येष्ठ मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रवेशामुळे दिंडोरीत भाजपला फायदा होणार असल्याची अटकळ असली तरी प्रत्यक्षात गावित स्वत: थेट भाजपच्या प्रचारासाठी उतरणार नसल्याचे वृत्त आहे. किंबहुना, त्यांचे सर्मथकही राष्ट्रवादीचेच काम करणार असल्यामुळे गावित यांच्या पक्षांतरामुळे दोन्ही पक्षांना फार फायदा वा तोटा होईल, असे चित्र नाही.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून कन्या हिना यांना उमेदवारी मिळण्यासाठी विजयकुमार गावित आग्रही होते. प्रत्यक्षात तब्बल नऊ वर्षे या मतदारसंघातून खासदार झालेले, तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले. त्यामुळे विजयकुमार गावित यांनी भाजपकडून हिना यांना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे कॉँग्रेस आघाडी धर्म पाळला न गेल्याचा ठपका ठेवत गावित यांना बडतर्फ करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे केवळ नंदुरबारच नाही, तर दिंडोरीतील समीकरणे बदलतील, अशी अटकळ होती. मुळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने निरीक्षक म्हणून गावित यांनाच पाठवले होते. गावित यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार यांच्याबरोबरच तालुकानिहाय बैठका घेऊन चाचपणी केली होती.
उमेदवार निश्चितीपासून तर प्रचार रणनीती ठरवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत ते होते. या मतदारसंघात गावित यांचा सर्मथकवर्गही मोठा असल्यामुळे भाजप प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीला बसेल, असे अंदाज वर्तवले गेले. प्रत्यक्षात गावित यांच्या निकटवर्तीयांनुसार, दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या प्रचारासाठी ते उतरणारच नाही. केवळ नंदुरबारमधील गावित विरुद्ध गावित या संघर्षापुरतीच त्यांची बंडखोरी असून, विधानसभा निवडणुकीच्यावेळी चित्र उलटेही असेल. त्यामुळेच त्यांचे सर्मथकही राष्ट्रवादीच्याच प्रचारात व्यस्त असल्याचेही सांगितले जाते.