आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

ना पराभवाचे दु:ख, ना विधानसभेची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात कॉँग्रेसचा एक, तर मित्रपक्षाचा दोन जागांवर दारुण पराभव झाल्यानंतर कॉँग्रेसच्या गोटात मात्र दु:ख वा त्याबाबत चिंतन करावे असे वातावरण नाही. किंबहुना, जिल्हाध्यक्षांचा अपवाद वगळला तर उर्वरित पदाधिकारी सुटीच्या मूडमध्येच असल्याचे चित्र आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शेजारील दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार पराभूत झाल्या. कॉँग्रेसबाबत बोलायचे तर धुळ्याची जागा पक्षाकडे होती. धुळे मतदारसंघातील बागलाण, मालेगाव हे दोन तालुके नाशिक जिल्ह्यात येत असल्याने येथून मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी या पदाधिकार्‍यांवर होती. प्रत्यक्षात नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या असहकार्याबाबत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याने कॉँग्रेस पदाधिकार्‍यांची धावपळ झाली. त्यात राजी-नाराजी नाट्यामुळे काही नेते इच्छा असूनही प्रचारात सहभागी झाले नाहीत, तर काहींच्या पथ्यावर बाब पडल्यामुळे त्यांनी धुळे मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केले. दरम्यान, मोदी लाटेचा तडाखा नाशिकला बसल्यानंतर तिन्ही जागा कॉँग्रेस आघाडीकडून गेल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावर बैठकांचा धडाका सुरू आहे. तुलनेत कॉँग्रेसच्या गोटात शांतता असून प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेश देऊनही जिल्हा व शहर कॉँग्रेसमध्ये शांतता कायम आहे.