आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi, Narendra Modi, Nashik

महायुतीत भाजपचं ‘हे वागनं बरं नव्हं..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी तन-मन-धनाने प्रचार करण्याचा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार स्थानिक पदाधिकार्‍यांना देण्यात येत आहे. तरीही राज्यातील एकमेव अशा नाशिक महापालिकेच्या सत्तेत भाजप-मनसेची युती आणि राज ठाकरे यांच्याकडूनही ‘नमो नमो’चा गजर केला जात असल्याने नेमके मतदान कोणाला करायचे, अशी संभ्रमावस्था पारंपरिक मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यातच शहराध्यक्षांविरोधातील नाराजी ऐन निवडणुकीत उफाळून आल्याने शिवसेनेला तापदायक ठरत आहे. त्यामुळे ‘हे वागनं बरं नव्हं’ असं म्हणत पक्षांतर्गत चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी पक्षाला कायमच मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार्‍या शिस्तबद्ध पदाधिकार्‍यांनी दखल घेत अखेरच्या टप्प्यात त्यांनाच स्वत: प्रचाराची सूत्रे हाती घ्यावी लागणार, असे चित्र आहे.


नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडणूक रिंगणात असून, त्यांची राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्याशी लढत होणार आहे. एकीकडे मनसे आणि राष्ट्रवादी सर्व ताकदीनिशी त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून प्रचार यंत्रणा राबविताना दिसत आहे. त्याप्रमाणात मात्र, शिवसेना आणि महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेला भाजपचा फारसा प्रभाव प्रचारात दिसत नसल्याने पक्षाशी बांधिलकी असणार्‍या मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. युतीच्या उमेदवारांची घोषणा होताच शहरात भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे होर्डिंग्ज झळकविण्यात आले. यावर कुठेही महायुतीच्या पक्षांची नावे, चिन्हांचा समावेश नव्हता. पक्षाच्या या ‘एकला चलो रे’च्या धोरणामुळे शिवसेनेत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच हे होर्डिंग्ज झळकणे बंद झाले असले तरी भाजप-सेनेतला विसंवाद पावलोपावली दिसून येतो. शहरांतर्गत गटबाजीचे दर्शनही प्रत्येक सभा, मेळाव्यांमध्येही उमटत असल्याने त्याचाही फटका काही प्रमाणात सेनेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. पालिकेत 14 नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यापैकी मोजकेच चार-पाच चेहरे प्रचारात सक्रिय दिसतात. तर, पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पदाधिकार्‍यांवर दिंडोरी मतदारसंघाची जबाबदारी दिल्याने त्यांचा अधिक वेळ त्या भागातच खर्ची पडत आहे. माजी आमदार, माजी शहराध्यक्ष प्रचारात फिरकतही नसल्याने सेनेची संपूर्ण भिस्त भाजपच्या दोन-चार नेत्यांवर आहे.


सूर जुळण्यासाठी ‘मध्यस्थी’
शहरांतर्गत गटबाजी युतीच्या नुकसानीचे कारण ठरू नये, यासाठी पक्षाच्या निष्ठावंतांनीच पुढाकार घेत किमान निवडणुकांपर्यंत शांत राहा. नरेंद्र मोदींसाठी सर्व विसरून कामाला लागावे, असा सल्ला दिला. खुद्द संघाच्या मुशीतून आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतील मंडळींनी मध्यस्थी केल्याने शेवटच्या टप्प्यात तरी गोडसेंच्या प्रचारासाठी एकत्र येतील, अशी शक्यता वर्तविली आहे.


मनसे-सेना संभ्रम कायम
महायुतीत शिवसेनाच प्रमुख घटक पक्ष असून, शिवसेना उमेदवारालाच निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी वारंवार विनंती वजा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंहांपासून महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते करीत आहेत. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही जाहीर सभांमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार निवडून द्या, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोडसे की पवार, असा संभ्रम कायम आहे. मनसे एकही संधी सोडत नसून, प्रचारपत्रकांवर मोदींचे छायाचित्र झळकवित आहे. त्याकडे भाजपच्या स्थानिक ते प्रदेश पातळीवरच्या नेत्यांकडून कुठलाही जाहीर खुलासा होत नसल्याने त्यात भरच पडत आहे. धुळे मतदारसंघात तिकीट कापले गेल्याने नाराज विद्यमान खासदार प्रतापदादा सोनवणे हेदेखील धुळे, दिंडोरी, नाशिकमधील प्रचारापासून अंतर राखून आहेत. ज्या प्रकृतीच्या कारणाने तिकीट गेले, त्याच कारणाने घरी राहणेच पसंत करतात.