आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Hailstorm, Divya Marathi, Nashik

उमेदवारांच्या प्रचारातून गारपिटीचा मुद्दा गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार विविध मुद्दय़ावर प्रचार करीत आहेत; मात्र जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांत ग्रामीण भाग येत आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या मुद्दय़ाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बहुतांश उमेदवारांनी आपला व्यवसाय हा शेती दाखवूनही गारपिटीने दु:खी असलेल्या शेतकर्‍यांच्या वेदनांवर फुंकरही घातली जात नाही.


नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे 802 गावांतील एक लाख 76 हजार 675 शेतकर्‍यांचे एक लाख तीन हजार 224 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासाठी राज्याने अल्पनिधीही दिला. आचारसंहिता सुरू झाल्यानंतर गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी नेते पुढे आले नाहीत. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री म्हणून सिन्नर तालुक्याचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांच्या प्रचारातून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचा मुद्दा गायब झाला आहे. तसेच युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिनकर पाटील, तानाजी जायभावे, हरिश्चंद्र चव्हाण, भारती पवार, डॉ. प्रदीप पवार यांनीही आपण शेतकरी असल्याचे दाखवले आहे. शेतकर्‍यांच्या मतावर डोळा ठेवण्यासाठी किंवा इन्कमटॅक्सपासून सूट मिळण्यासाठी शेती दाखविणारे उमेदवार सध्या गारपिटीच्या मुद्यावर ब्र काढत नाहीत. सुरुवातीला तर आचारसंहितेचा भंग होऊन आपल्यावर कारवाई होईल या भीतीने एकाही पुढार्‍याने दौरा केला नाही की मदतीविषयी पुढाकार घेतला नाही. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आंदोलनानंतर जाग आलेल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मदत जाहीर केली होती. आमच्या दु:खाकडे कोणीही पाहात नाही म्हणून शेतकरी उमेदवारांवर चांगलेच संतापलेले दिसत आहेत.


सगळेच सोयीस्कररीत्या विसरले
जिन्स आणि टी-शर्टमधील शेतकरी पाहायला आवडेल, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. मात्र, त्यांच्या सध्या होत असलेल्या जाहीर सभांमध्ये नामोल्लेख वगळता ठोस असे काहीच वक्तव्य नाही. तसेच शेतकर्‍यांचे नेते असलेले शरद पवार यांच्याही पक्षाकडून हा मुद्दा पुढे आलेला दिसत नाही.