आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Indian Politics, Divya Marathi

उमेदवारांच्या अनुक्रमांकावरून राजकारण,नाशिकसाठी एकच बॅलेट युनिट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीचे वातावरण जसजसे तापू लागले, तशी मतदारांमध्येही आपल्याला मतदान करावयाच्या उमेदवाराच्या अनुक्रमांकावरून उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच त्यांना सोपं पडावं यासाठी अनुक्रमांकाबाबत उमेदवारांमध्ये वेगवेगळ्या शक्कलही लढविल्या जात असून, या अनुक्रमांकावरून आता राजकारणच रंगलं आहे.
प्रत्येक उमेदवाराचे आपला नंबर अगदी सहज मतदारांच्या स्मरणात राहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या पक्षाचे चिन्ह सांगण्याबरोबरच प्रत्यक्ष मतदान केंद्रात गेल्यानंतर घाई गडबडीत कुठल्याही चिन्हाचे बटण दाबू नये यासाठी आता हे उमेदवार आपला अनुक्रमांकच मतदारांना सांगत आहेत. नाशिक मतदारसंघाबाबत सांगायचे झाले तर एका बॅलेटवर 15 उमेदवारांचीच नावे आणि सोळाव्या क्रमांकावर नोटाचे बटणासाठी जागा होती. माघारीच्या वेळी 16 उमेदवार राहण्याची आणि नोटाचे बटण दुसर्‍या बॅलेटवर जाण्याची शक्यता वाढल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये या क्रमांकावरून संभ्रम निर्माण झाला होता.


लोकांना अमुक क्रमांकावरील बटण दाबण्याचे आवाहन केल्यास त्यांनी दुसर्‍याच बॅलेटवरील बटण दाबल्यास मोठा अनर्थ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने यातील अपक्षांचे प्रबोधन करून माघार घेण्यासाठीही काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या सर्मथकांनी प्रयत्न केले अन् त्यात ते यशस्वी झाल्याने आता एकच बॅलेट युनिट नाशिकसाठी वापरावे लागणार असल्याने या उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. आता उमेदवारांचा क्रम हा मराठीतील बाराखडीप्रमाणे आणि प्रथम राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार त्यानंतर नोंदणीकृत पक्षाचे आणि त्यांच्या खालोखाल अपक्ष उमेदवारांची नावे या बॅलेट युनिटवर अनुक्रमानुसार नमूद करण्यात आली आहेत.