आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोलपांची अडचण, इच्छुकांची धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी देवळालीचे आमदार बबनराव घोलप यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने ते निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण होताच सुमारे 25 वर्षांपासून आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍या सर्वपक्षीय इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सन 1990 पासून आजपर्यंत आमदार घोलप यांनी नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदारसंघात कोणालाही शिरकाव करू दिलेला नाही. त्यामुळे देवळालीची ओळख ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणूनच झाली आहे. तीन वर्षांच्या शिक्षेमुळे घोलप अपात्र ठरण्याच्या शक्यतेनेही इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. याबाबत निकाल आल्यानंतर लगेचच मोर्चेबांधणीसही सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास सदाफुले यांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये घोलप यांना आव्हान दिले होते. या वेळीदेखील ते पुन्हा इच्छुक असून, नानासाहेब सोनवणे, सुनील कोथमिरे, दीपक वाघ, हरीश भडांगे, वैशाली दाणी आदींचा इच्छुकांच्या यादीत प्रामुख्याने समावेश आहे. 2009 मध्ये कडवे आव्हान देणार्‍या मनसेकडून राजू वैरागर, प्रमोद साखरे, तर काँग्रेसकडून लक्ष्मण मंडाले, कन्हैया साळवे यांनी तयारी सुरू केली आहे. घोलप अपात्र ठरल्यास त्यांच्याऐवजी शिवसेनेकडून त्यांचे पुत्र योगेश व कन्या माजी महापौर नयना यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. महायुतीत असलेल्या रिपाइंचे विश्वनाथ काळे, सुनील कांबळे हेही इच्छुक आहेत. एबी फॉर्म गहाळ झाल्याने एकदा संधी हुकलेले घोलपांचे पुतणे रविकिरण यांनीही प्रयत्न सोडलेले नाहीत. शिवसेना, मनसे व पुन्हा शिवसेना असे राजकीय रिंगण पूर्ण करणारे प्रताप मेहरोलिया यांचे नावही इच्छुकांमध्ये आहे.
पराभव पाहिला तो एकदाच..
वयाची साठी गाठलेल्या घोलप यांनी देवळालीतून आजपर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढवल्या आहेत. सन 1985 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर त्यांना पराभव असा ठाऊक नाही. 1990 च्या निवडणुकीत 32 हजार मतांनी त्यांचा पहिला विजय झाला व ते उत्तर महाराष्ट्रातील एकमेव शिवसेना आमदार झाले. 1995 च्या निवडणुकीतील दुसर्‍या विजयानंतर ते राज्य मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्री झाले. 1999 मध्ये पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून उभे ठाकत त्यांनी पुन्हा विजयाला गवसणी घातली होती. नंतर 2004 व 2009 साली झालेल्या निवडणुकीत ते पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाले.