आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Elections,Latest News In Divya Marathi

भाजपची रणनीती ठरणार प्रवक्त्यांच्या आजच्या बैठकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-लोकसभा निवडणूक प्रचार यंत्रणा व केंद्रीय नेतृत्वांच्या जाहीर सभांच्या आयोजनाबाबत भाजप मुंबईत मंगळवारी होणार्‍या प्रवक्ते व निवडक पदाधिकार्‍यांच्या बैठकीत नियोजन ठरवणार आहे. महायुतीच्या कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवारांसाठी संयुक्त सभा घ्यायच्या व प्रचाराची रणनीती काय असावी, हेदेखील त्यातच निश्चित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नावानेच मते लोकसभा मतदारसंघात मागितली जात असून, त्यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग्ज लावले जात आहेत. यंदा पक्षाकडून पारंपरिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतच रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटनेशी युती करून महायुती करण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता मोजक्याच ठिकाणी शिवसेना-भाजप नेत्यांच्या संयुक्त सभा घेण्यात येत होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी, तसेच पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी व राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेनेशी निर्माण झालेला दुरावा दूर करण्यासाठी एकत्रित प्रचारयंत्रणा राबविण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. पक्षाच्या प्रमुख वक्त्यांमध्ये नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, मुख्तार अब्बास नकवी, गोपीनाथ मुंडे या नेत्यांचा समावेश आहे. यासंदर्भात, राज्यभरातील विभागीय स्तरावरील प्रमुख प्रवक्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.