आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी तयारी, मात्र गटबाजीलाही उभारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी कॉँग्रेसच्या शहर कार्यकारिणीने शनिवारी मेळावा घेतला खरा; परंतु प्रोत्साहन तर दूरच, कडवट गटबाजीची परंपरा या मेळाव्यानिमित्त या वेळीही पुढे आली. विशेष म्हणजे गटबाजीचा समारोप होऊन आजपासून एकोप्याचे वातावरण निर्माण झाल्याच्या वल्गना मेळव्यातील नेत्यांनी केल्या. प्रत्यक्षात मेळाव्यापूर्वी विश्रामगृहावर झालेले नाराजी नाट्य, होर्डिंगबाजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषणबाजीतही उमटलेला गटबाजीचा सूर यामुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणूक कॉँग्रेस कशाच्या आधारावर आणि कोणाच्या भरवशावर लढवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटबाजीची परंपरा कॉँग्रेससाठी नवी नाही. आकाश छाजेड यांच्या हाती शहराध्यक्षपदाची सूत्रे दिल्यानंतर हेवेदाव्यांचे अक्षरश: फटाकेच फुटत आहेत. आमदार जयप्रकाश छाजेड यांनी घराणेशाही पुढे चालवत आकाश छाजेडांची शहराध्यक्ष म्हणून वर्णी लावली असा आरोप करीत, त्यांचे पक्षीय विरोधक कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस कमिटीतील मेळाव्यानिमित्तही हेच चित्र कायम होते. पक्षाचे नेते तथा वनमंत्री पतंगराव कदम तसेच जिल्ह्याचे प्रभारी भाई जगताप हे नाशिकमध्ये दाखल होताच नाराज गटाने त्यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, शैलेश कुटे, डॉ. हेमलता पाटील, शिवाजी गांगुर्डे, केशव पाटील, राजीव टर्ले आदींचा समावेश होता. मेळाव्याचे निमंत्रण आम्हाला दिलेच नाही, बैठकांना बोलवलेच, तर त्यात अपमानित केले जाते, असे आरोप करीत शहराध्यक्ष बदलण्याची मागणी या वेळी निमसेंनी केली.

कॉँग्रेस कमिटीच्या बाहेर लावलेल्या फलकांवरही गटबाजी ठळकपणे अधोरेखित होत होती. यातील काही फलकांवर शहराध्यक्षांचे नाव व फोटो टाळण्यात आला होता. मेळाव्याच्या ठिकाणी छाजेड विरोधी गटातील अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते. या वेळी डॉ. बच्छाव यांनी मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत असे सांगत मतभेद असल्याची कबुली दिली. अन्य नेत्यांच्या भाषणातही गटबाजीचा उल्लेख उघडपणे झाला, असे असतानाही कॉँग्रेसमधील गटबाजी आज संपुष्टात आल्याचे सांगत नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. इतके सारे नाट्य एका दिवसात घडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर कॉँग्रेस कशाच्या आधारावर दावा करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

काय हवे, बाकी की वजाबाकी?
मेळाव्यातील भाषणात आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शोभा बच्छाव यांना आपणच वेळोवेळी मदत केल्याची जाणीव करून दिली. ‘आकाश तुमचा भाचा आहे, त्याला सांभाळून घ्या’, असे सांगत छाजेड यांनी विधानसभा निवडणुकीत तुमचा 32 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता, याची त्यांना आठवण करून दिली. हा फरक भरून काढायचा की पराभवात आणखी 32 हजार मते समाविष्ट करायची, असा प्रश्न करीत छाजेडांनी जणू गर्भित इशाराच दिला.