आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Looting Aakraman Sanghtana Mereged In Nationalist Congress

लाखो रुपयांची लूट करणारी आक्रमण संघटना राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये विलीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाब विचारताना महिला.
नाशिक - नाशिक शहर व परिसरातील अनेक गावांमधील सुमारे ८ हजार महिलांना गृहउद्योग देण्याचे आमिष दाखवून आक्रमण या संघटनेतर्फे त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करण्यात आली. इतकेच नव्हे तर या सर्व महिलांना बुधवारी एकत्र करून शक्तीप्रदर्शन करत ही संघटना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलिन झाली. या रॅलीसाठी प्रत्येक महिलेकडून १०० ते २५० रुपये
उकळण्यात आल्याचेही समोर आले आहे. मात्र खरा प्रकार उजेडात आल्यानंतर हजारो महिलांनी आक्रमण संघटनेचा संस्थापक संतोषकुमार शर्मा याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांच्या गराड्यात तो राष्ट्रवादी भवनातून निसटून गेला.

नाशिकरोड, जेलरोड, टाकळी, देवळाली कॅम्प, सिन्नर फाटा , संसरी गाव, सामणगाव, भगूर आणि जुने नाशिक परिसरातील महिलांना गृहोद्योग मिळवून देण्याचे आमिष दाखवून शर्मा व त्याच्या साथीदारांनी प्रत्येकी १०० ते २५० रुपये घेऊन या महिलांना संघटनेचे सदस्य बनवले. बुधवारी भालेकर मैदानावर त्याबाबत अंतिम बैठक होऊन कामाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ‘आज आलात तरच काम मिळेल, अन्यथा मिळणार नाही’ असा निरोप देण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने या महिला मैदानावर जमल्या होत्या.

घरबसल्या कमाईचे आमिष
चॉकलेट, मसाला, मेणबत्ती यांचे पॅकिंग, पापड बनविण्यासारखे घरबसल्या काम करून किमान २५० रुपये रोज किंवा ७५०० हजार रुपये महिना देण्याचे आमिष दाखवून महिलांना भालेकर मैदानावर गोळा करण्यात आले. बहुतांश जणी स्वखर्चाने टेम्पो, सिटीबससह जमेल त्या वाहनाने जमा झाल्या. बैठकीच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना संघटनेच्या
कार्यकर्त्यांनी अचनाक ‘ढोल, ताशांच्या गजरात राष्ट्रवादी भवनात जायचे आहे, तेथेच तुम्हाला कामाचे वाटप होईल, सुप्रियाताई सुळे तिथे भेटतील, कामाचे स्वरुप तिथेच सांगू’, असे सांगून मिरवणुकीत सहभागी करून घेण्यात आले. काही महिलांनी मात्र मैदानावरच संयोजकांबद्दल संताप व्यक्त करून काढता पाय घेतला. मिरवणुकीत सहभागी महिलांना बरोबर
घेत राष्ट्रवादी भवनवर नेऊन आक्रमण या संघटनेचे विलीनीकरण राष्ट्रवादीत करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.

वृध्द महिलांसह बालकांचेही हाल
काही महिला मुलांना घरी ठेवून, तर अनेक जणी तान्ह्या बाळांना बरोबर घेऊन कामाच्या आशेने भालेकर मैदानावर आल्या होत्या. या प्रकारामुळे मध्यमवयीन, अपंग तसेच लेकुरवाळ्या महिलांचे प्रचंड हाल झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कोण आहे संतोषकुमार?
बहुतांश पावत्या महिलांच्या माध्यमातून फाडण्यात आल्याने त्यांना संतोषकुमार शर्मा कोण तेच ज्ञात नव्हते. काहींनी तो संसरीचा तर काहींनी पाथर्डी फाट्याचा रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र, त्याला शोधून काढूच, असे महिला तावातावाने सांगत होत्या.

पावत्यांचे गोलमाल
आक्रमण संघटनेच्या नावाने कुणाला १०० तर कुणाला २५० रुपयांच्या पावत्या देण्यात आल्या. त्या बदल्यात कामाच्या नोंदीसाठी डायरी, ओळखपत्र दिले जाईल, असेही सांगण्यात आले. त्यासाठी महिलांकडून दोन फोटो, रेशनकार्ड किंवा आधारकार्डच्या झेरॉक्सदेखील जमा करून काम नियोजनबद्ध असल्याचे भासविण्यात आले. काहींकडून नुसतेच पैसे घेऊन
भालेकर मैदानावरच पावती व कामाचे वाटप करु, असेही सांगण्यात आले होते.

हे तर राजकीय षंडयंत्र
आक्रमण संघटनेचे राष्ट्रवादीत विलिनीकरण होणार असल्याची माहिती महिलांना देण्यात आलेली होती. त्यांच्याकडून पैसे घेण्यात आलेच नाहीत. राजकीय हेतूने संघटनेला बदनाम करण्याचे षंडयंत्र काही पक्षांच्या वतीने रचले गेले.
संतोष शर्मा, संस्थापक अध्यक्ष, आक्रमण संघटना

राष्ट्रवादीचा संबंध नाही
आक्रमण संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शनदेखील केले. भुजबळ साहेबांशी चर्चा करुन त्यांना प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता या संघटनेचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नाही.
अर्जुन टिळे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस