आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांना प्रतीक्षा: भगवान केदारनाथचे द्वार सहा महिने बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जुलैमध्ये महाभयंकर जलप्रलयाचा फटका बसलेली उत्तराखंड राज्यातील श्रीक्षेत्र केदारनाथ यात्रा करण्यासाठी आता भाविकांना सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिमप्रपात होण्यास सुरुवात झाल्यामुळे केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे मुख्य प्रवेशद्वार बुधवारी सकाळी विधिवत बंद करण्यात आले.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख ज्योतिर्लिंग आणि भाविकांचे र्शद्धास्थान असलेल्या भगवान केदारनाथ मंदिरांचे प्रवेशद्वार कैलासमठाचे प्रमुख स्वामी सविदानंद सरस्वती, मंदिराचे मुख्याधिकारी बी.डी.सिंग, जिल्हाधिकारी राघव लंघर, पोलिस अधीक्षक बजेंद्र सिंग, भीमाशंकर रावल, वादीव पुजारी आदींच्या उपस्थितीत बंद करण्यात आले, अशी माहिती स्वामी संविदानंद सरस्वती यांनी ‘दिव्य मराठी’ला दूरध्वनीवरून दिली.

11750 फूट उंचीवर हिमालयाच्या शिखरावर 80 फूट उंचीचे केदारनाथ मंदिर असून विशाल गाभार्‍यात भगवान श्ांकराची पंचमुखी मुर्ती विराजमान आहे. मंगळवारी मध्यरात्री 3 वाजता साधूमहंत, प्रशासकीय अधिकार्‍यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. याठिकाणी पूजा अर्चा करीत धार्मिक विधीस प्रारंभ झाला. तब्बल तीन तास चाललेल्या विधीनंतर 108 किलो भस्म, महावस्त्र अर्पण करण्यात आले. यानंतर बुधवारी सकाळी 7 वाजता प्रवेशद्वार बंद झाले. तत्पूर्वी केदारनाथची प्रतिकृती असलेल्या चांदीच्या पंचमुखी मूर्तीची पालखी काढून त्याचेही पूजन केले. या मूर्तीची उखीमठ येथे प्रतिष्ठापना झाली असून याच ठिकाणी आता सहा महिने दररोज सकाळी आणि सायंकाळी पूजन करण्यात येणार आहे.

25 किलोमीटर पायी प्रवास
सोमप्रयाग ते केदारनाथपर्यंतचा रस्ता बंदच असल्याने मंगळवारी दुपारी साधू-महंत, अधिकार्‍यांना 25 किमी पायी प्रवास करावा लागला. या परिसरात उणे तपमान असून नळाला पाणी देखील येत नसून सर्वत्र बर्फ झालेला दिसून येत असल्याचेही स्वामी संविदानंद यांनी सांगितले.

अक्षयतृतीयेपासून दर्शन खुले
दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात साधारणत: बर्फ पडत असल्याने वाहतूक बंद पडते. त्यानंतर उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयेच्या वेळी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी खुले केले जाते. त्यामुळे भाविकांना आता सहा महिन्यांनतरच दर्शन घेता येणार आहे.