आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचोरी उघड केल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कमी गॅस भरलेल्या सिलिंडरचे वितरण रोखून गॅसचोरीचा प्रकार उघड केल्याचा दावा नगरसेवक डॉ. विशाल घोलप व काही नागरिकांनी केला. गुरुवारी सकाळी पेठरोडवरील वैशालीनगर येथे हा प्रकार घडला. पुरवठा विभाग व पोलिस कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गॅस एजन्सीतर्फे वितरण करणारी गाडी (एम. एच. 03 ए. एच. 1710) या भागात आली होती. 15 गॅसधारकांना त्याचे वितरण करण्यात येणार होते. चालक वितरण करताना सहजपणे टाक्या उचलत होता. भरलेली टाकी एवढी सहजगत्या उचलणे शक्य नसल्याने ग्राहकांना संशय आला. नागरिकांनी डॉ. घोलप यांना बोलावले असता त्यांनी नागरिकांसह जवळच्या काट्यावर 15 सिलिंडरचे वजन केले. तेव्हा प्रत्येक टाकीत 5 ते 6 किलो गॅस कमी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विचारणा केली असता जुना साठा असल्याने गॅस कमी भरल्याचे स्पष्टीकरण संबंधितांनी दिले.

घोलप यांनी स्थानिक पुरवठा विभागाशी संपर्क साधून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात एजन्सी व पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही एजन्सी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

आम्ही संयुक्त कारवाई करू
चंद्रकांत गॅस एजन्सीबाबत नगरसेवक डॉ. घोलप व काही नागरिकांनी गॅस चोरीची तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तत्काळ पोलिसांना कल्पना दिली आहे. पकडलेल्या गाडीसह सिलिंडर पोलिस ठाण्यात निगराणीत आहेत. भारत गॅसचे विक्रीकर अधिकारी तुषार जगताप यांना त्याबाबत सांगितले असून ते बाहेरगावाहून येताच शहर धान्य वितरण अधिकारी आणि पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व पोलिस संयुक्त कारवाई करतील. महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी

या प्रकरणात माझा काय दोष ?
सदर एजन्सीच्या गाडीवरील कामाचा आज माझा पहिलाच दिवस होता. मी केवळ गाडी भरली आणि ग्राहकांना सिलिंडर वितरित केले. हे सिलिंडर किती किलोचे आहेत, याची मला कल्पना नाही. त्यामुळे या प्रकरणी माझा काही एक दोष नाही. बाळा जगताप, वाहन चालक

कारवाई न केल्यास आंदोलन करणार
गॅस चोरी करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही केले असून सिलिंडर वजनानेही कमीच भरले आहे. प्रत्यक्ष चोरी पकडून दिल्याने आता कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा, मनसे स्टाइलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. डॉ. विशाल घोलप, नगरसेवक