आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LPG Gas Cylinder Government Subsidy Issue At Nashik

नाशिक: गॅस सबसिडीच्या बँक खात्याबाबत संभ्रमावस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केरोसीन सबसिडीनंतर आता गॅसची सबसिडीही बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, गॅसग्राहकांनाही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, याबाबत गॅस एजन्सीला कुठलेही आदेश नसल्याचे गॅस विरतक संघटनेच्या वतीने सांगण्यात आल्याने बँक खात्याची माहिती कोणाकडे द्यावयाची, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

केरोसीन आणि गॅसमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने त्यांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. जवळपास सहा लाखांपेक्षा अधिक केरोसीनधारकांची खाती उघडली. उर्वरित सुमारे चार लाख खाती उघडण्यास जनतेचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने खाती उघडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, गॅसची सबसिडी आता बँक खात्यात जमा होणार असल्याने खाती उघडण्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पण, सबसिडी कुठून मिळणार आणि खाते नंबर कुठे द्यावयाचा, याचे कुठलेही स्पष्ट आदेश शासनाच्या वतीने पुरवठा विभाग आणि गॅस वितरकांना देण्यात आले नाही.

शहरातील गॅसधारक : नाशिक धान्य वितरण विभागात 4 लाख 91 हजार 995 गॅसग्राहक असून, त्यात एक लाख 90 हजार 757 हे एक सिलिंडरधारक आहेत. तीन लाख एक हजार 238 हे दोन सिलिंडरधारक आहेत. एजन्सीकडे जवळपास 8 हजार 220 कनेक्शन बंद केल्याचे आढळून आले आहे, तर 42 हजार बोगस गॅसग्राहक आढळून आले आहे.

सबसिडी केव्हापासून जमा होणार? : गॅसचे अनुदानित सिलिंडर साडेचारशे रुपये दराने विकले जात आहे. त्यामुळे सबसिडी केव्हापासून बँक खात्यात जमा केली जाईल यामुळे ग्राहक गोंधळात आहे. तर त्याबाबत वितरकच अनभिज्ञ असल्याने खाती उघडावयाची कशाला असाही प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

31 मार्चपर्यंत दोनच सिलिंडर
शासनाने 13 सप्टेंबरनंतर तीन अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नुकताच 19 जानेवारीला त्यात दोन सिलिंडरची वाढ केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता मार्चपर्यंत दोन सबसिडी गॅस सिलिंडर एजन्सीकडून दिले जाणार आहे. त्याचे वितरणही सुरू झाल्याचे एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बँक खात्याची माहिती नाही
गॅस सबसिडीसाठी बँकेत खाती उघडण्यास कोणी सांगितले, याचे कुठलेही आदेश आम्हाला कंपनीकडून किंवा शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्याचप्रमाणे 19 जानेवारीनंतर सर्वांनाच सरसकट मार्चपर्यंत दोन सिलिंडर दिले जातील. तसा उल्लेखही पावतीवर असेल. लक्ष्मण मंडाले, अध्यक्ष, जिल्हा गॅस वितरक संघटना