आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसमाफियांवर मेहरबानी कोणाची?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यच नाही तर खुद्द पुरवठा खात्यासाठीही डोकेदुखी ठरलेल्या गॅसच्या काळाबाजाराचा मुद्दा देवळालीतील अनधिकृत गॅस केंद्रांत झालेल्या स्फोटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार सुरू असून, प्रामुख्याने वाहनांचे इंधन व हॉटेल व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. अधिकार नसतानाही पुरवठा खात्याने कारवाई केली असली तरी, त्याचा पाठपुरावा गॅस उत्पादक कंपन्यांकडून होत नसल्यामुळे गॅसमाफियांना अभय मिळत असल्याचीही बाब समोर आली आहे. पुरवठा खात्याने मध्यंतरी शासनाला एक अहवाल पाठवून जिल्ह्यात चार लाख ग्राहकांकडे शिधापत्रिका नसतानाही गॅसचे कनेक्शन दिल्याची बाब लक्षात आणून दिली. मात्र, या नोंदण्या रद्द करून काळाबाजारात जाणारे सिलिंडर थांबवले गेलेले नाही. गॅसचा काळाबाजार व असुरक्षित तथा धोकेदायक गुदामांवर डी.बी. स्टारचा प्रकाशझोत...
कधी जाग येणार? - गॅसचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई या समस्यांमुळे मागील वर्षात पुरवठा व महसूल खात्याची प्रचंड बदनामी झाली. गॅसचा सर्रास काळाबाजार सुरू असताना पुरवठा खाते का कारवाई करीत नाही असे प्रश्न उपस्थित करून महसूल यंत्रणेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले. त्यानंतर पुरवठा खात्याने शासनाला पत्र पाठवून स्वत:च्या अधिकारांची मर्यादा आणि गॅस उत्पादक कंपन्यांच्या बेफिकिरीकडे लक्ष वेधले. पुरवठा खात्याने पत्रात म्हटले की, शहरातील अनेक गॅस वितरकांकडून काळ्याबाजारात गॅस सिलिंडर विक्रीसाठी पाठवले जात आहे.
काही ठिकाणी वाहनांसाठी अवैधरित्या गॅस भरण्याकरिता घरगुती सिलिंडर पुरवली जात आहे. पुरवठा खात्याने अनेकवेळा धाडी टाकून गॅस सिलिंडर जप्त केले. गॅस पुरवठा करणा-या वितरकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश दिले मात्र गॅस कंपनीच्या विक्री अधिका-यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे गॅसमाफियांना मोकळे रान मिळाले. मध्यंतरी तर पुरवठा खात्याने विक्री अधिका-यांनाच सहआरोपी करण्याबाबत पोलीसांकडे शिफारसही करून बघितली. मात्र, त्यानंतरही काळाबाजार थांबलेला नाही.
चार लाख अनधिकृत गॅस ग्राहक - शिधापत्रिका नसताना जिल्ह्यात चार लाख ग्राहकांना गॅस जोडण्या दिल्याची बाब संगणकीकृत शिधापत्रिका मोहिमेतून उघड झाली. याबाबत गॅस उत्पादक कंपन्यांच्या विक्री अधिका-यांनाही कळवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कारवाई झालेली नाही. या ग्राहकांना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे गॅसची जोडणी दिली. एकापेक्षा जास्त कनेक्शन देताना कुटुंबात वेगवेगळ्या नावाने कनेक्शन दिले का या प्रश्नांची उत्तरे पुरवठा खात्यालाच विक्री अधिका-यांकडून मिळालेली नाही.
विहितगावमधील धोकेदायक छापा - देवळाली गावातील अनधिकृत गॅस भरणा केंद्रांत झालेल्या स्फोटानंतर पुरवठा खात्याने नाशिकरोड परिसरातील अनुभव सांगितला. नाशिकरोडमध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. 2010 मध्ये पुरवठा खात्याच्या जीवावर एक कारवाई बेतली असती असे मोहिमेत सहभागी झालेल्या अधिका-यांचे म्हणणे आहे. विहितगावजवळील एका इमारतीत गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पुरवठा खात्याने तत्परता दाखवून घटनास्थळी धाव घेतली. येथे एका सिलिंडरचे पुनर्भरण करण्याचे काम सुरू होते. पुरवठा खात्याच्या गाड्या बघून काळाबाजार करणा-यांनी पलायन केले. त्यात सिलिंडरमधून गॅस बाहेर पडू लागला. पळण्यापूर्वी माफियांनी दुकानाचे शटर ओढले. त्यामुळे गॅस कोंडला गेला. पथकातील अधिका-यांनी धाडस करून शटर खाली केले व गॅस सिलिंडर बंद केले. या प्रकरणात शेजारील दुकानदारांना विचारणा केल्यानंतर सूत्रधार व जागामालकाची माहिती कोणीच दिली नाही. दहशतीमुळे लोक उघडपणे बोलत नव्हते. स्वत:च्या जिवावर बेतू शकेल असे अनधिकृत गॅस भरणा केंद्र सुरू असतानाही स्थानिक नागरिक मूग गिळून बसल्याची खंत मोहिमेत सहभागी अधिका-यांनी व्यक्त केली.
पुरवठा खात्याची कारवाई - जानेवारी 2009 ते डिसेंबर 2010 या कालावधीत काळाबाजारासाठी जाणारे 932 घरगुती गॅस सिलिंडर पकडण्यात आले. 22 गुन्हे दाखल करण्यात आले. जानेवारी 2011 ते आॅगस्ट 2011 मध्ये 355 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी 45 गुन्हे दाखल झाले. या व्यतिरिक्त पोलिसांनी केलेली कारवाई वेगळीच आहे.
यांच्याविरुद्ध झाले गुन्हे दाखल - घरगुती गॅसचा काळाबाजार : गणेश निंबा कासार चांदवड, (ग्राहक), महेश सुभाष माळी, मनमाड, महेश विठ्ठल पटेल, सिडको, ललित शर्मा, नाशिक, श्रीराम भाटीया, नाशिक. सुदर्शन हेगडे, आनंदा निकम, लक्ष्मीनारायण हेगडे, महेंद्र आहेर, राजेंद्र निकम, देवळा, मोहमद नबी शेख व कादीर नबी शेख, भारतनगर, नाशिक. सुरजितसिंग चौधरी, सटाणा
विक्री अधिका-यावरच गुन्हा - मनमाड येथील प्रसाद एजन्सी विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही विक्री अधिका-यांकडून कारवाई होत नव्हती. अखेर पुरवठा खात्याने टोकाची भूमिका घेत 25 जानेवारी 2010 रोजी कंपनीचे विक्री अधिकारी तुषार जगताप यांच्याविरोधातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण देत गुन्हा दाखल केला.
गॅस वितरकांवर गुन्हे - नाशिक येथील जय गुरुदेव गॅस एजन्सीवर 7 नोव्हेंबर 2009 मध्ये गॅस कनेक्शन देताना वस्तू खरेदीची सक्ती केली जात असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इगतपुरीत पुनीत चांडक यांच्यावर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
नियमित तपासणी करतो - गॅस वितरकांची तसेच गुदामाची नियमित तपासणी करीत असतो. ग्राहकांच्या तक्रारी, गॅस सिलिंडरचे वितरण याकडेही लक्ष दिले जाते. गुदामात अग्निशामक यंत्रणा बसवताना एक्सप्लोझिव्ह डिपार्टमेंटकडून परवानगी घेतली जाते. त्यांच्याकडून ना हरकत दाखलाही घेतला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस वितरकांना अग्निशामक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील. - महेश राव, विक्री अधिकारी, एचपीसीएल
पुरवठा अधिकारी व्ही. एन. शिंदे यांना थेट प्रश्न
* शहरात गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे का?
- घरगुती गॅसचा वाणिज्य वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या की, तातडीने कारवाई केली जाते.
* ठोस कारवाई का होत नाही?
- काळाबाजार करणा-यांवर पुरवठा खाते जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा दाखल करते. मात्र पुढील प्रक्रिया व संबंधित वितरकावर कारवाई करण्याचे अधिकार गॅस कंपनीच्या विक्री अधिका-यांना आहेत. त्यांनीच ठोस कारवाई केली पाहिजे.
* गॅसची गुदामे सुरक्षित आहेत का?
- शहरातील गॅसची गुदामांची पुरवठा खाते तपासणी करते. मात्र, सुरक्षितता व अगिीशामक यंत्रणेची तपासणी कंपनीच्या अधिका-यांकडून केली जाते. मात्र, आम्ही यापुढे लक्ष घालून तपासणी करू.