आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टील बांधणीच्या सुसज्ज एसटी बसेस येणार प्रवाशांच्या दिमतीला; सुरक्षिततेवर विशेष भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एसटी महामंडळाकडून नाशिक विभागातील १३ आगारांतून लांब मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर साधारण ६०० ते ७०० बसेस रोज धावतात. सद्यस्थितीचा विचार करता यापैकी बहुतांश बसेसची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही बसेसचे दरवाजे मोडकळीस आलेले, काहींच्या काचा फुटलेल्या तर, काही बसेस काळा धूर ओकत आहेत. म्हणूनच या सर्व प्रकारांना वैतागलेल्या प्रवाशांकडून आरामदायी देखण्या खासगी लक्झरी बसेस वा अन्य वाहनांना पसंती दिली जाते आहे.
 
परिणामी एसटीच्या तोट्यात अधिक भरच पडत आहे. यावर उपाय म्हणून एसटी प्रशासनाकडून प्रवासी वाढवा अभियान, उत्पन्न वाढवा अभियान, बसस्थानक स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवत प्रवासी अधिकाधिक आकर्षित होतील, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, वाढत्या स्पर्धेच्या युगात खासगी प्रवासी बसेसची स्थिती, बसेसचे स्वरूप लक्षात घेता प्रवासी वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने या बसेसचे परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या अॅॅल्युमिनियमऐवजी वजनाने स्टील बांधणीच्या नवीन रंगसंगतीच्या या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पुणे येथील दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसेसची बांधणी करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक बस काही दिवस धावणार असून, काही दिवसांनंतर त्या नाशिकला मिळणार आहेत.
 
 
नवीन बसेसचे असे असेल स्वरूप
{ बसेसची उंची जुन्या बसेसच्या तुलनेत ३० सेंटिमीटरने वाढविण्यात आली असून, बसेसची उंची ३.४ मीटर असेल.
{ बसेसची उंची वाढल्यामुळे सामान ठेवण्याची जागा (लगेज स्पेस) जुन्या बसेसच्या तुलनेत तिपटीने वाढणार आहे.
{ या बसच्या खिडक्या जुन्या बसेसपेक्षा आकाराने मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत.
{ बसची बांधणी करताना सांध्यांमध्ये थर्माकोलचा वापर केल्याने प्रवासात गाडीचा आवाज होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
{ या गाडीचे फलक एलईडी आहेत.
{ गाडीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या छताला तीन रूफ हॅच बसविण्यात आले आहेत.
{ चालक-वाहकांना बसेसचे नादुरुस्त चाक, पंक्चर झालेले चाक बदलण्यासाठी पर्यायी चाक सहज उपलब्ध होईल, अशी सुविधा असेल.
{ प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकाजवळ माइकची सुविधा करण्यात आली आहे.
{ आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी अलार्मची सुविधा.
{ बस धावताना हवेचा अवरोध कमी करण्यासाठी बसचे डिझाइन एअरोडायनॅमिक बनविण्यावर भर देण्यात आला आहे.
 
 
लांबचा प्रवास सुखकर ठरणार
पारंपरिक लालडब्याचा खडखडाट खरंतर लांबच्या प्रवासासाठी अत्यंत त्रासदायक ठरतो. त्यामुळे एस. टी. महामंडळाने सुरक्षित प्रवासासाठी आरामदायी बसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लांबचा प्रवासदेखील सुखकर ठरेल. -अविनाश पाटील, ज्येष्ठ नागरिक
 
प्रवास होईल सोयीस्कर
एसटीमध्ये करण्यात येणाऱ्या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यास मदत होईल. तसेच, अधिकाधिक प्रवासी आकर्षित होण्यास मदत होणार हाेईल. -सचिन कर्डिले, प्रवासी
 
अशी आहे आकडेवारी
०४ शिवनेरी बसेस सेवेत
२२० बसेसद्वारे होते शहरी प्रवासी वाहतूक
७०० बसेस विभागात प्रवासी वाहतूक करतात
१३ आगारांतून विभागात प्रवासी वाहतूक
 
प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक भर
एसटीचा अपघात झाल्यावर प्रवाशांना गंभीर दुखापत होऊन जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून परिवर्तन बसेसची बांधणी करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे. याचसाठी अॅल्युमिनियमऐवजी मजबूत दणकट अशा माइल्ड स्टीलचा उपयोग करून या बसेसची बांधणी करण्यात आली आहे.
 
तोटा कमी होऊन उत्पन्नवाढीस मदत शक्य
काही वर्षांपासून एसटी प्रशासनाचा नफ्याचा आलेख सातत्याने खालावत आहे. अशी परिस्थिती असताना अत्याधुनिक स्वरूपाच्या या परिवर्तन बसेसकडे प्रवासी आकर्षित होण्याची अधिक शक्यता असल्याने उत्पन्न वाढीस मदत होणार आहे. याबरोबरच खासगी प्रवासी वाहनांऐवजी प्रवाशांना एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.
 
टप्प्याटप्प्याने विभागात बसेस होणार सुरू
नाशिक विभागात मध्यम लांब पल्ल्याच्या मार्गासाठी नव्या बसेस टप्पाटप्प्याने विभागाला प्राप्त होणार आहेत. शहर बसेसच्या वाढत्या तोट्यामुळे संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला होत असलेला तोटा कमी होऊन या नवीन स्वरूपाच्या बसेसमुळे नवसंजीवनी मिळणार आहे.
 
सुखकर प्रवासासाठी एस. टी. महामंडळाचे पाऊल, तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना
अॅॅल्युमिनियमऐवजी स्टील बांधणीच्या मजबूत नवीन रंगसंगती असलेल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. काही वर्षांपासून तोट्याच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या बससेवेचे यानिमित्ताने सक्षमीकरणास मदत होऊ शकेल. खासगी बसेसच्या धर्तीवर एसटीचेही ‘परिवर्तन’ करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला अाहे. त्याअंतर्गत या आधुनिक स्वरूपाच्या या बसेस जिल्ह्यातील मार्गांवर धावणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...