आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम.ए. परीक्षेच्या निकालात त्रुटी; पुणे विद्यापीठाचा पुन्हा गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एम.ए.च्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विषयाच्या परीक्षेचे जाहीर केलेले निकाल पूर्णपणे चुकले अाहेत. विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी विद्यापीठाकडे अर्ज केले असून, फेरनिकालाची पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार अाहे.
पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटल्यानंतर महाविद्यालयांत २३ जानेवारी रोजी निकाल हातात मिळणार, असे सांगण्यात आले होते. मुळात विद्यापीठ संकेतस्थळावरही हे निकाल उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी पुणे विद्यापीठातील सगळ्याच विद्यार्थ्यांच्या नोंदी संकेतस्थळावर हव्या होत्या, त्या ठिकाणी फक्त सहा विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षाच्या नोंदी पाहायला मिळाल्या. त्यातही चार विद्यार्थी उत्तीर्ण, तर दाेन विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्याचे दर्शविले अाहे. विद्यापीठ संकेतस्थळावरील या निकालांवर विश्वास ठेवता विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रतीक्षा केली. मात्र, त्यातही निकाल चुकले असून, ते बदलून मिळण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले गेले. एम.ए.साठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना हे अनुभव आले आहेत.
विद्यापीठ संकेतस्थळावर निकाल उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात येते. क्रेडिट सिस्टिम लागू झाल्यापासून सगळ्या निकालांमध्ये ग्रेड दिली जाते. त्यामुळेच कदाचित निकाल चुकले असण्याचा अंदाज शिक्षकांनी व्यक्त केला. यामुळे ज्यांचे सेमिस्टर पॅटर्न आहेत, अशा विद्यार्थ्यांना या महिन्याच्या शेवटी परीक्षा अर्ज भरायचे आहेत. त्यासाठी त्यांना निकालाची गरज भासते. परीक्षा अर्जांमध्ये सुमारे शंभर विद्यार्थ्यांना पास किंवा नापास विषयांची नोंदणी करून पुढच्या सत्रास प्रवेश घ्यायचे असतात. निकाल मिळाल्यास विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरणार आहेत. वेगळी परीक्षा पद्धती अवलंबविताना विद्यापीठाची तयारी नसते, हे या गाेंधळातून दिसून येत अाहे.

४५ दिवसांच्या नियमाचा विसर
विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल परीक्षेनंतर ४५ दिवसांत देणे बंधनकारक अाहे. त्यानुसार पुढील प्रवेशाचे नियोजन केले जाते. विद्यापीठाच्या नेहमीच्या कारभारावरून हा निकाल केव्हा हाती पडणार, हा प्रश्न अाहे. यामुळे ४५ दिवसांच्या नियमाचा विसर विद्यापीठाला पडला असल्याची चर्चा अाहे.

परीक्षेवर होणार परिणाम..
विद्यापीठाच्या या चुकलेल्या निकालांचा परिणाम परीक्षा अर्ज भरण्यावर होणार आहे. यामुळे विद्यापीठाला परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी लागण्याची चिन्हे दिसतात. निकाल हाती येण्याअाधीच परीक्षा अर्ज भरावे लागल्यास त्यात काय नोंदी करायच्या, असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला अाहे.