आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विभागात बारावीचा निकाल 4.23 टक्क्यांनी वाढला, नंदूरबारचा सर्वाधिक निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल मागीलवर्षीच्या तुलनेत ४.२३ टक्क्यांची वाढ झाली असून एकूण निकाल ८८.२२ टक्के लागल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी दिली. महत्वाचे म्हणजे, गेल्या पाच वर्षांत नाशिक विभागाचा निकाल ९.२१ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यातील नऊ विभागांच्या तुलनेत यंदाही नाशिक विभागाचा निकाल तळाशी लागला असून मुंबई विभागाचा ८८.२१ तर नाशिकचा ८८.२२ टक्के आहेत. राज्यात कोकण विभागाचा निकाल सलग सहाव्या वर्षी सर्वाधिक म्हणजेच ९५.२० टक्के लागला आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दि. ३० मे रोजी बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. नाशिक विभागात ९५२ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १ लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी प्रविष्ठ होते. विभागातील २१८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यातील एक लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १८ हजार ७६२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नाशिकमध्ये ७० हजार ९९ विद्यार्थी प्रविष्ठ होते, त्यातील ६१ हजार ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वात कमी म्हणजेच ८७.०९ टक्के लागला आहेत.
 
विभागात नंदुरबार अव्वल...
विभागात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला असून ९१.०५ टक्के लागला असून नाशिक जिल्ह्याचा सर्वात कमी ८७.०९ टक्के निकाल लागला आहेत. तर धुळे  जिल्ह्याचा निकाल ९०.८९ टक्के, जळगाव जिल्ह्याचा निकाल ८७.६२ टक्के लागला आहे.

९ जुनला मिळणार गुणपत्रिका
विद्यार्थ्यांना निकालाची मुळ प्रत येत्या ९ जुनला दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत मिळणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नुमना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकीतप्रतीसह बुधवार दि. ३१ मे ते ९ जून जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. तर छायांकीत प्रतीसाठी १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल.

पाच वर्षांतील आकडेवारी...
वर्ष- टक्केवारी
मार्च २०१२- ७३.९९ टक्के
मार्च २०१३- ७९.०१ टक्के
मार्च २०१४- ८८.७१ टक्के
मार्च २०१५- ८८.१३ टक्के
मार्च २०१६- ८३.९९ टक्के
मार्च २०१७- ८८.२२ टक्के

११ जुलैपासून पुरवणी परीक्षा
दहावी व बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळातर्फे जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. जुलैमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सोमवार दि. ५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे सादर करावयाची आहेत.  सदर परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...