आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election Through Editor Eyes, Divya Marathi

संपादकांच्या नजरेतून...हवेची दिशा ओळखण्याचेच आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी येवला, सिन्नर, नांदगाव, निफाड, मालेगाव, देवळालीसह शहरातील तीन मतदारसंघांतील लढती प्रचंड अटीतटीच्या, गडबड-गोंधळाच्या ठरू पाहत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, मतदान दहा दिवसांवर येऊन ठेपलेले असताना कोणत्या पक्षाची हवा आहे आणि त्याचा रोख नेमका किती वा कोणाकडे असेल, याचा अंदाज बांधणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मायावती, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले या नेत्यांसह जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांच्या प्रचारसभा आपापल्या कुवतीनुसार व शक्तिस्थळं हेरून होत आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवाराला आपलेच पारडे जड असा साक्षात्कार होऊ लागला असून त्यामुळे संभ्रम वाढत चालला आहे.
येवल्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. मराठ्यांचा पक्ष ही राष्ट्रवादीची ओळख लपून राहिलेली नाही. सत्ता आलीच तर मुख्यमंत्रिपद आपसूक अजित पवार यांच्याकडे जाईल, असा मतप्रवाह या पक्षात आहे. तशातच छगन भुजबळ यांचे नावही ओबीसींचा मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आले. पक्षाध्यक्ष शरदरावांनीही चर्चेचे खंडन केले नाही. पर्यायाने या खेळीमागे त्यांचा हात असावा, असाही एक मतप्रवाह आहे. तर अशा रीतीने मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार भुजबळ येवला संघातून हॅट््ट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेत भुजबळ पराभूत झाले. पराभव जिव्हारी लागल्याने ते घायाळही झाले. आता येवल्यातून भुजबळ अन् नांदगावमधून मुलगा पंकज रिंगणात आहेत. दशकभरामध्ये येथे विकासाची गंगा ज्या गतीने वाहिली ती याअगोदर दिसली नाही. पण या ओघात भुजबळांकडून काही जवळची मंडळी दुखावली गेली तर अनेक जण दुरावले. विकासापेक्षाही विरोधकांनी जातीची समीकरणे पुढे रेटली, बाप-बेट्याला हाच मुद्दा तापदायक ठरू लागला.

नाशिक शहरात मध्य, पूर्व, पश्चिम व देवळाली असे चार मतदारसंघ आहेत. गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या चलतीमुळे नाशिककरांनी तीन आमदार व महापालिका निवडणुकीत ४० नगरसेवकांचे दान मनसेच्या पदरात टाकले. नाशिककरांना केवढा विश्वास राजसाहेबांच्या नेतृत्वावर. साहेब दुपारी झोपेतून उठायचे अन् सायंकाळी थेट नाशिक मुक्कामी येऊन चूळ भरायचे एवढी त्यांना नाशिकची ओढ अन् विकासकामांचा उरक. साहेबांपेक्षा शिलेदारांना अधिक विकासाचा ध्यास. या निवडणुकीत, नाशिककर मास्तरांनी राजसाहेबांसकट त्यांच्या वसंत गिते व नितीन भोसले या दोन आमदारांची परीक्षा घ्यायची ठरवल्यामुळे या सर्वांनाच पेपर अवघड जाईल अशी एकूण लक्षणं आहेत. आमदार उत्तमराव ढिकले यांनी मैदानातच न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते सुटले. देवळालीमध्ये शिवसेनेकरवी यंदा नवीन भिडू आला असला तरी तो माजी आमदार बबन घोलप यांचा वारस आहे. बेहिशेबी संपत्तीचा दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने घोलपांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे बबनरावांनी मुलगा योगेशला िशवसेनेची उमेदवारी मिळवून दिली. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये सर्वच पक्षांनी उमेदवार टाकले असून त्यांच्यातील मतविभाजन तसेच दलितेतर अर्थात मराठा समाजाला आपलेसे करण्याच्या घोलपांच्या नीतीला राष्ट्रवादीचे नितीन मोहिते यांनी चांगलाच शह दिला आहे. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध राजाभाऊ वाजे ही लढत अटीतटीची आहे. लोकसभेतील हिशेब चुकता करण्यासाठी भुजबळांनी येथे लक्ष घातले आहे. काँग्रेसमधून आमदार झालेले कोकाटे दगाफटक्याच्या भीतीने भाजपत गेले अन् पुन्हा आखाड्यात उतरले. दोन मराठा विरुद्ध एक वंजारी अशी लढत झाली तर मतविभाजनाने वंजारी उमेदवार सहजपणे निघून जाऊ शकतो असे वातावरण आहे. काँग्रेसचे संपतराव काळे यांनीही मुसंडी मारल्याने स्पर्धा चांगली आहे. निफाडमध्ये लढत खरोखरच उत्कंठावर्धक आहे. शिवसेनेचे आमदार अनिल कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्यात चुरस आहे. पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांशी केलेली दांडगाई कदमांच्या अंगाशी आली होती. याअगोदर सलग तीन वेळा निफाडचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत मालोजीराव मोगल यांचा मुलगा राजेंद्र रिंगणात उतरला आहे.
नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मालोजीकाकांना श्रद्धांजली म्हणून राजेंद्रला उमेदवारी बहाल केल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेस वा राष्ट्रवादीचे शरदराव असो, तिथे आदराचे स्थान असणारे वनाधिपती विनायकदादा पाटील यांची या निवडणुकीत चांगलीच कोंडी झाली. त्यांचा पुतण्या वैकुंठ पाटील भाजपचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यामुळे वनाधिपतींची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही निवडणूक असो, भीष्माचार्यांच्या भूमिकेत वावरणारे वनाधिपती त्यामुळे सध्या दाट वनामध्ये भूमिगत असल्यागत झाले आहेत.

इगतपुरीत काँग्रेस आमदार निर्मलाताई गावित, शिवसेनेचे उमेदवार शिवराम झोले यांच्यातील लढत रंगतदार आहे. काँग्रेसच्या या दोन आजी-माजी आमदारांच्या लढाईमध्ये राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर यांनीही रंगत वाढवली आहे. हा मतदारसंघ आदिवासीबहुल असून याठिकाणी आमदार दुस-यांदा निवडून येत नाही, अशी परंपरा आहे.

मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या संघांमध्ये अनुक्रमे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल व दादा भुसे हे दोन आमदार नशीब आजमावत आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबीयांचा वरचष्मा असलेला मालेगाव बाह्य दशकभरापासून भुसे यांनी पादाक्रांत केला आहे. मौलाना यांनीही मोदी सरकार सत्तारूढ होताच राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार माजी आमदारपुत्र व माजी महापौर आसिफ रशीद यांची कडवी झुंज आहे. भुसे यांना सुनील गायकवाड यांनी आव्हान दिले आहे.
चांदवडमध्येही आमदार शिरीष कोतवाल विरुद्ध माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र डॉ. राहुल यांच्यातील लढत रंगली आहे. सहयोगी सदस्य म्हणून वावरणारे कोतवाल ऐन निवडणुकीत हवा पाहून काँग्रेसवासी झाले. काँग्रेसचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केला खरा; पण त्यांचा हिरमोड झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून लढत चालू ठेवली आहे.
बागलाण व सुरगाणा-कळवण, दिंडोरी हे तिन्ही मतदारसंघ आदिवासीबहुल आहेत. बागलाणमध्ये भाजपने आमदार उमाजी बोरसे यांना डच्चू दिला अन् त्यांचे ज्येष्ठ बंधू व माजी आमदार दिलीप बोरसे यांना रिंगणात उतरवले. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका यांनी आव्हान उभे केले आहे. कळवणचे आमदार ए. टी. पवार यांच्यासाठी नववी निवडणूक कौटुंबिक कलहामुळे तापदायक ठरू शकते. त्यांना माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांचे आव्हान आहे. दिंडोरीमधून शिवसेनेचे आमदार धनराज महाले लढत आहेत. त्यांना पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व सध्या काँग्रेसकडून लढणारे माजी आमदार रामदास चारोस्कर व राष्ट्रवादीचे माजी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. नाशिक जिल्ह्यातील वातावरण कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने वाहत नाही.