आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Bans Betel Leaf, 'maava' And Flavoured Tobacco Mix

आम्ही जगायचे तरी कसे, आमच्या लेकरांना शिकवायचे कसे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिवसभर मान पाठ एक करून छोट्याशा जागेत बसलेले व्यावसायिक. पोटासाठीची लढाई आणि त्यात जीवघेणा शासकीय आदेश! सुगंधी तंबाखू आणि सुपारीवर बंदीचा आदेश आल्यापासून त्यांची काळजी वाढली आहे. आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत मसाले पान लावण्यावरही सरकारने बंदी घातल्याने आता आम्ही काय करायचे, लेकरांचे शिक्षण कसे करायचे, असे अनेक प्रश्न हे विक्रेते करीत आहेत.

गुटखा बंदीचे कोणतेही सर्मथन न करता हे विक्रेते इमाने इतबारे टपरीतील इतर पदार्थ विक्रीस तयार आहेत. परंतु मसाला पानात टाकल्या जाणार्‍या सर्वच पदार्थांवर बंदी घातल्याची चर्चा असल्याने करावे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यातील बहुतांश विक्रेत्यांचा पान विक्रीचा पिढीजात व्यवसाय आहे.

अपंगांचाही हिरावला जाणार रोजगार

अपंगांसाठी पानविक्रीचा व्यवसाय सुकर असतो. एका जागेवर बसून हा व्यवसाय शक्य असल्याने त्यांचा उदरनिर्वाह त्यावर होतो. परंतु नव्या अध्यादेशामुळे हा व्यवसायच संकटात आला असून, या व्यवसायातील अपंगांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आम्हालाही विश्वासात घ्या
शासनाने अध्यादेश काढण्यापुर्वी सर्वसामान्य विक्रेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या व्यवसायावर किती कुटूंबांचा उर्दनिर्वाह चालतो हे देखील लक्षात घ्यावे. एकाएकी व्यवसाय बंद करुन आम्ही उर्दनिर्वाह कसा करणार? शासनाने या नियमाचा पुर्नविचार करावा. विश्वनाथ देवाडिगा, पान दुकानदार

गुटखाबंदीला सहकार्य करू
सरकारने अन्याय करू नये. आमच्या परिस्थितीचा विचार करून आदेश मागे घ्यावा. गुटखाबंदीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. अशोक पुजारी, पान दुकानदार

चोरांच्या रांगेत उभे केले
तंबाखू वा सुगंधी सुपारी कोणत्याही पानात वापरल्यास कलम 328 प्रमाणे अटक होऊ शकते. वास्तविक, हे कलम गुंगीचे औषध देऊन कोणाची लूटमार केल्यास लागू होते. त्या रांगेत आम्हाला उभे करून आम्हाला चोर ठरवले आहे. सुनील अमृतकर, व्यावसायिक

सुपारीशिवाय पानच नाही
सुवासिक तंबाखू किंवा सुपारीशिवाय पान तयार होतच नाही. या वस्तूच पान दुकानात विकायच्या नसतील तर केवळ सिगारेट आणि विड्याच विकाव्या लागतील. विजय कासलीवाल, अध्यक्ष, होलसेल व्यापारी संघ


आकडे बोलतात
शहरात पान टपर्‍या 5000
जिल्ह्यात पान टपर्‍या 1,00,000
शहरात होलसेलर 50
जिल्ह्यात होलसेलर 1000
सुपारी विक्री करणारे किराणा दुकानदार हजारो