नाशिक- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचे फलित म्हणून पुढील पाच वर्षांत जपान भारतात दोन लाख दहा हजार कोटी रुपये गुंतविणार असून, या गुंतवणुकीचा फायदा लघु व मध्यम उद्योगांनाही व्यवसाय विस्ताराच्या स्वरूपात मिळणार आहे. उद्योग किंवा त्यांची उत्पादने कितीही मोठी असली, तरी त्याकरिता लागणारे सुटे भाग याच भारतीय उद्योगांकडून जपानच्या उद्योगांना घ्यावे लागणार असल्याने या संधीचा फायदा घेण्याकरिता मात्र
आपण सक्षमपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांच्यासमवेत जपानला गेलेल्या भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळात समावेश असलेले महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राम भोगले यांनी केले.
चेंबर,निमा, आयमातर्फे निमा हाऊस येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भोगले बोलत होते. व्यासपीपठावर ह्यिनमाह्णचे अध्यक्ष रवी वर्मा, उपाध्यक्ष संजीव नारंग, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग विभागाचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश माळी होते.
भारतीय सेनेकरिता लागणारी, आयात केली जाणारी सुरक्षा साधने, सार्वजनिक वाहतुकीकरिताच्या सुविधा ज्यात बुलेट ट्रेन आणि त्यानंतर अगदी तलाव, छोटे तळे, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी यांसारखी कामे जपानच्या या गुंतवणुकीतून होणार असून, प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजा जपानी उद्योजकांना भारतीय उद्योजकांकडून भागवाव्या लागणार असल्याने मोठी व्यवसायवृद्धीची संधी उपलब्ध असून, त्याकरिता आता स्वत: प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले.
जपान्यांना भावनिक साद
इंडो-जपान बिझनेस फोरम असो की, दुस-या दिवशी झालेली जपान ट्रेड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाची चर्चा असो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदीमधूनच भाषण केले. भाषणातील विविध टप्प्यांवर ते जपान्यांना भावनिक साद घालत होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा परिणामही होताना दिसत होता. मुळात जपानी भावनिक होत नाहीत, पण मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद िमळाला. भारतातील लोकशाही व स्वतंत्र न्यायव्यवस्थेबरोबरच उपलब्ध युवा मनुष्यबळ आणि जपानी उत्पादनांना भारतात असलेली प्रचंड मागणी मोदींनी जपानी व्यावसायिक, उद्योजकांपुढे मांडली, असे भोगलेंनी सांगितले.
तर २१ वे शतक आशियाचे
आशियातील जपान आणि भारत या अनुक्रमे दोन आणि तीन क्रमांकांच्या अर्थव्यवस्था आहेत. या अर्थव्यवस्था एकत्र आल्यास २१ वे शतक आशिया खंडाचे असेल, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. सन १९८४ नंतर असे प्रामाणिक प्रयत्न करणारा पंतप्रधान या देशाला लाभल्याचे भोगले यांनी स्पष्ट करून माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या संगणक क्रांतीच्या िनर्णयाचा दाखला िदला आणि त्यांच्या मागे जनमत प्रभावीपणे उभे राहिले नाही, आता मात्र ते आहे ते कायम राहू द्या आणि केंद्रात जसे सत्तांतर घडविले तसेच राज्यातही घडवा, असा सल्लाही भोगले यांनी उपस्थित उद्योजकांना दिला.