आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनोधैर्य’साठी 60 कोटींची गरज, अवघे 15 कोटी मंजूर, 928 पीडित आर्थिक मदतीपासून वंचित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘सगळीकडे बोभाटा झाला. माझ्या मुलीची आता सोयरीक होणार नाही. पैसे मिळाले तर तिला तिच्या पायावर तरी उभी करेन’, डोळ्यात पाणी आणून तिचे वडील सांगत होते. गेल्या ३० जुलैची घटना. गावातच राहाणाऱ्या मावसभावाने तिला घरकामासाठी बोलावली. त्यानं आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.

केस दाखल झाली. आरोपीला अटक झाली. पण पीडित मुलीच्या कुटुंबाला अद्याप मदत मिळालेली नाही. आरोपी वाळूच्या ट्रकवर ड्रायव्हर आहे. पीडित मुलीचे वडील गावात मोलमजुरी करणारे. ‘मनोधैर्य’ योजनेनुसार तिला १५ दिवसात आर्थिक मदत मिळायला हवी होती. प्रत्यक्षात महिना उलटला तरी एक फुटकी कवडीही तिच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मनोधैर्यच्या बाबत असेच चित्र राज्यभर आहे.
ही व्यथा तिची एकटीची नाही. राज्यातल्या तब्बल ९२८ अत्याचार पीडित मुली ‘मनोधैर्य’ योजनेपासून वंचित आहेत. बलात्कार आणि लैंगिक अत्याचार पीडितांना तत्काळ मदत म्हणून अर्थसहाय्य देण्याची तरतूद या योजनेत आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचार हे गुन्हे दाखल झाले की जिल्हा महिला विकास कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तत्काळ पीडित मुलीची भेट घेऊन, तिच्या घरची पाहाणी करून सात दिवसात जिल्हा मंडळापुढे प्रस्ताव मांडणे अभिप्रेत आहे. जिल्हा मंडळात त्या प्रकरणाची चर्चा होऊन तो प्रस्ताव आर्थिक मदतीसाठी राज्याकडे पाठवण्यात येतो. गेल्या अडीच वर्षात असे ९२८ प्रस्ताव महिला व बालविकास खात्याकडे निधीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने पीडित महिलांपर्यंत ते अर्थसहाय्य पोहोचलेले नाही. परिणामी त्यांच्या आधार देण्याच्या कामात अडथळे येतात.
राज्यातील या ९२८ पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी ६० कोटींचा प्रस्ताव महिला व बालविकास खात्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, फक्त १५ कोटींचा निधी प्रत्यक्षात मिळाल्याने पीडित महिलांपर्यंत यंत्रणेला मदत पोहोचवता आलेली नाही.
कोपर्डीसारख्या प्रकरणांमध्ये गाजावाजा झाला तेव्हा एका रात्रीत शासनाने पीडित मुलीच्या कुटुंबाला ही ३ लाखांची आर्थिक मदत तत्काळ सुपूर्त केली. पण गेल्या दोन वर्षांपासून निधीआभावी मदत न पोहोचलेल्या या ९२८ पीडितांना निधीअभावी शासन मदत देऊ
शकलेले नाही.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, निराधार ‘मनोधैर्य’
बातम्या आणखी आहेत...