आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन विशेष: अभ्यासक्रम मान्यतेचा अखेर जुळला ‘योग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मोठ्या भवतीन‌्भवतीनंतर योग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा द्राविडी प्राणायाम संपला असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर योगाच्या पदवी अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या संदर्भात विद्यापीठाने दोन महाविद्यालयांचे प्रस्ताव सेंट्रल कौन्सिल ऑफ योगाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. यात नाशिक येथील योग विद्याधाम आणि लोणावळा येथील कैवल्यधाम यांचा समावेश आहे. जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत योग अभ्यासक्रम सुरू व्हावा, यादृष्टीने सहा वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू झाले होते. मृदुला फडके यांच्या कुलगुरूपदाच्या कार्यकाळात या प्रयत्नांना जोर आला होता. परंतु, कालांतराने अभ्यासक्रमाविषयीच्या संपूर्ण चर्चेला विराम मिळाला होता. त्यानंतर अभ्यासक्रमासाठीचे प्रयत्नच बंद झाल्याने या महत्त्वाकांक्षी निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या आधीच तो मागे पडला. परंतु, डॉ. अरुण जामकर यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी योग अभ्यासक्रमाच्या मागणीला ‘बुस्ट’ दिला. आरोग्य, मन:शांती, व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता अशा सर्वांगीण उन्नतीसाठी बौद्धिक विकासासाठी योग आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम मत असल्याने त्यांनी योग अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा केला. या अनुषंगाने बॅचलर आॅफ नॅचरोपॅथी अॅण्ड योगिक सायन्स या पदवीस मान्यता देण्यात आली आहे. नाशिक येथील योग विद्याधाम आणि लोणावळा येथील कैवल्यधाम यांनी योग अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्ताव दिले होते. या प्रस्तावाला विद्यापीठाने मान्यता देत त्यास सेंट्रल कौन्सिल आॅफ योगाकडे ते अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.
यंदापासून स्वतंत्र फेलोशिप : विद्यापीठामार्फतयोगासाठी स्वतंत्र फेलोशिप देण्याचीही योजना यंदा सुरू करण्यात येणार आहे. देशभरातील डॉक्टर्स या फेलोशिपचा फायदा घेऊ शकणार आहेत. त्याचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
योग विद्याधाम
डॉ. विश्वास मंडलिक यांनी सुरू केलेली योग विद्या धाम ही संस्था गेली ५० वर्षे योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रासह भारतात ठिकठिकाणी तसेच परदेशातही शाखा आहेत. योगाभ्यासाबरोबरच योग विद्या धामतर्फे रुग्णांना निसर्गोपचार आणि त्याच्याशी निगडित अभ्यासक्रम घेतले जातात. तसेच त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथे योग विद्या गुरुकुल या ठिकाणी सुमारे ७२ देशांतील परदेशी साधक योगाचे प्रशिक्षण घेतात. योग विद्या धामतर्फे वेळोवेळी आरोग्यदायी जीवनासाठी व्याख्याने, परिसंवाद आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते.
कैवल्यधाम विद्यालय
लोणावळा (पुणे) येथे कैवल्यधाम हे जगातील सर्वात जुने असे योग विद्यालय आहे. या विद्यालयात फक्त योग शिकवला जात नाही, तर तर प्रत्येक योग धारणेबद्दल आधुनिक संशोधन केले जाते. जगन्नाथ गणेश गुणे ऊर्फ स्वामी कुलवयानंद यांनी आपले गुरू परमहंस माधवदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन ऑक्टोबर १९२४ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर कैवल्यधामची स्थापना केली. कैवल्यधाम योग केंद्र १८० एकर जागेत वसलेले आहे. "परंपरागत योगाची नवीन विज्ञानाशी सांगड घालणे’ हा कैवल्यधामचा मुख्य उद्देश आहे.
आरोग्य विद्यापीठाची जबाबदारी...
- वैश्विक पातळीवर योग दिन सुरू होणे ही भूषणावह बाब आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचीही योगाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आहे. यादृष्टीने योगाच्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.
डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, आरोग्य विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...