आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena Attempts Cleanness Contract Cancel

वादग्रस्त सफाईचा ठेका रद्द करण्यासाठी मनसेची एकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये १३२० कर्मचाऱ्यांमार्फत सफाई करण्याचा वादग्रस्त पाच काेटी रुपयांचा ठेका रद्द करण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी एकी केली अाहे. संबंधित वाॅटरग्रेस लिमिटेड या ठेकेदाराकडे पालिकेची ९५ लाख रुपयांची थकबाकी, तसेच यापूर्वी वादग्रस्त कामामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यापर्यंत झालेल्या कारवाईचा संदर्भ देत चुकीच्या कामापासून चार हात दूर राहण्याची भूमिका घेतली जाणार अाहे. दरम्यान, दबाव वापरून ठेका मंजूर केला तर उगाच कारवाई नकाे म्हणून शनिवारी (दि. ४) हाेणाऱ्या सभेलाच अनुपस्थित राहण्यापर्यंत तयारी केली गेली अाहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेत जादा दराच्या निविदांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू असून, त्यासाठी रात्री उशिरापर्यंत पालिकेत सुरू असलेल्या दरबाराबाबत सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने वृत्त दिले हाेते. एवढेच नव्हे, तर जादा दराने काम पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदारांची कशी रिंग हाेते, यावर प्रकाश टाकला हाेता. त्यानंतर स्थायी समिती सभेत प्रा. कुणाल वाघ राहुल दिवे या नगरसेवकांनी निविदापूर्व बैठकीसाठी अालेले अाठ ठेकेदार अचानक कसे गायब झाले जेव्हा तीन वेळा मुदतवाढीनंतर चाैथ्यांदा अगतिकपणे पालिकेला काम देण्याची वेळ अाली, तेव्हा कसे अवतीर्ण झाले याकडे लक्ष वेधले हाेते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत साधुग्रामसह भाविक मार्गावरील स्वच्छतेच्या काेटी रुपयांच्या ठेक्यांना मंजुरी देण्यात अाली. यात साधुग्रामच्या सफाईसाठी पाच काेटी रुपयांच्या ठेक्याचा प्रस्ताव अचानक ठेवल्यामुळे चांगलेच वादंग झाले हाेते. नगरसेवकांनी प्रस्तावाचा अभ्यास नसल्यामुळे नामंजूर करण्याची मागणी केली हाेती. मात्र, अति तातडीची बाब असे स्पष्टीकरण देत सभापती शिवाजी चुंभळे यांनी प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, प्रस्ताव मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगरसेवकांना अचानक प्रस्तावासाेबत असलेल्या एका लेखापरीक्षण अहवालाचा अर्थ उमगला. यात संबंधित वाॅटरग्रेस या मक्तेदाराकडे पालिकेची जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भातील कंत्राटाच्या अनुषंगाने ९५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्टीकरण हाेते. त्यामुळे या वादग्रस्त ठेकेदाराला काम द्यायचे की नाही, याचा निर्णय स्थायी समितीच्या काेर्टात टाकला हाेता. दरम्यान, या प्रकरणाबाबत वाच्यता झाल्यानंतर अाता नगरसेवकांनी बचावासाठी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. त्यासाठी मनसे, राष्ट्रवादीचे काही नगरसेवक संबंधित काम मंजूर करू नये वा करायचे असेल तर अामचा लेखी विराेध नाेंदवणारे पत्रही दाखल करून घ्यावे, अशी भूमिका घेत अाहेत. त्यासाठी मनसेच्या मेघा साळवे, सुरेखा भाेसले, संगीता गायकवाड अादी नगरसेवकांनी लेखी विराेध करीत प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली अाहे. यासंदर्भात मनसेचे महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले यांनी बैठकही घेतल्याचे समजते.
प्रस्तावनियमात असेल, तर मुख्यमंत्र्यांची घ्या मंजुरी : संबंधितठेकेदाराला काम देण्यासाठी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यावर भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा अाहे. डाॅ. गेडाम यांची ‘कार्यप्रणाली’ बघता त्यांनी उगाच वाद नकाे म्हणून स्थायीवर याेग्य ती वस्तुस्थिती कळवत मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे समजते. जेणेकरून नियमबाह्य काम मंजूर केल्याचा अाक्षेप त्यांच्यावर येणार नाही. दुसरीकडे पालिकेतील काही वजनदार पदाधिकारी ठेका मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त अाहे. मात्र, जळगाव येथील घरकुल घाेटाळ्याचे ताजे उदाहरण असल्याने तसेच हाच घाेटाळा उघडकीस अाणणारे कर्तव्यदक्ष अायुक्त पालिकेत असल्याने उगाच कारवाईची नाैबत नकाे म्हणून नगरसेवकांनी विराेधाचे अस्त्र काढले अाहे. त्यातून काहींनी ‘स्थायी’च्या बैठकीला हजेरी लावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विशेष म्हणजे, प्रस्ताव नियमात असेल तर प्रशासनाने तातडीने मुख्यमंत्र्यांकडून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मंजुरी घ्यावी, अशीही मागणी नगरसेवक स्थायीच्या सभेत करणार अाहेत.

‘रात्रीच्या दरबारा’त पुन्हा धडपड
संबंधितठेका देणे कसे महत्त्वाचे अाहे, तसेच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर काम दिले नाही तर काय नामुष्की येईल, हे पटवून देण्यासाठी पुन्हा महापालिकेत ‘रात्रीचा दरबार’ सुरू झाला अाहे. गुरुवारी रात्री महापालिकेतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मनसे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पुन्हा बैठका झाल्या. गेल्या अाठवड्यापासून दिवसाचा माेकळा वेळ साेडून रात्री प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी धडपड सुरू असल्यामुळे महापालिकेतील कारभार संशयाच्या भाेवऱ्यात सापडला अाहे.