आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Raj Thackeray, Divya Marathi

मनसेला घरभेद्यांचेच मोठे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जातीय समीकरणाने सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना घेरलेले असल्याने हे शिवधनुष्य पेलण्याचेच सर्वाधिक मोठे आव्हान प्रत्येक पक्षासमोर उभे ठाकले आहे. यातून मनसेही सुटलेली नसून, जातीय राजकारणाबरोबरच मनसेसमोर खरे आव्हान आहे ते घरभेद्यांचेच.


नाशिकमध्ये काट्याची लढत आहे ती आघाडीचे छगन भुजबळ, युतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार या त्रिकूटांमध्ये. आघाडीला गड शाबूत राखण्यासाठी, तर युतीला या मतदारसंघावर ताबा मिळवायचा आहे. दुसरीकडे या दोघांनाही मनसेला टक्कर देऊन आपली सत्ता कायम ठेवण्याचा आटापिटा करावा लागणार आहे. या सर्व राजकीय हालचालींमध्ये सर्वच पक्षांना जातीय समीकरणाने ग्रासले आहे. यातून मनसेही सुटू शकलेली नाही. पक्षातीलच काही नगरसेवक आणि पदाधिकारी हे अन्य उमेदवाराच्या दावणीला बांधले गेल्याने अशा घरभेद्यांना आवर घालण्याचे आव्हान आता मनसेला पेलावे लागेल. प्रचार शिगेला पोहोचण्याच्या बेतात असतानाच अशा प्रकारचे एक-एक आव्हान उभे राहत असल्याने पक्षामध्ये चलबिचल आहे. वर-वर देखलेपणाने कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांकडून एकवाक्यता दाखवली जात असली तरी आतून मात्र नाशिकरोड, सातपूर आणि सिडकोसारख्या भागातील काही नगरसेवकांकडून अन्य उमेदवाराला साथ दिली जात असल्याने मनसेतील डोकेदुखी काही प्रमाणात का होईना वाढली आहे.


कार्यकर्ते संभ्रमात..
अन्य उमेदवाराशी जवळीक असणार्‍या नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांकडून कार्यकर्त्यांना वेगळाच कानमंत्र आणि टिप्स दिल्या जात असल्याने आपण प्रचार नेमका कोणाचा करतो आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे किमान प्रमुख पदाधिकार्‍यांनी यावर लक्ष केंद्रित करून हा संभ्रम दूर करण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


पदाधिकार्‍यांचा नाराजीचा सूर
हेमंत गोडसेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षातून जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी राज यांच्या निकटचे डॉ. प्रदीप पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. साधारणपणे वर्षभरापासूनच पवारांचे नाव चर्चेत होते. केवळ घोषणा तेवढी बाकी होती. लोकसभेची तयारी म्हणून ठाकरे यांनी ग्रामीण भागात संपर्कदेखील वाढविणे सुरू केला होता. त्याचबरोबर गेल्या वेळी आमदारकीसाठी इच्छुक असलेले सभागृह नेता शशिकांत जाधव हेदेखील सभागृहनेतेपद मिळेपर्यंत काहीसे नाराज होते. सुजाता डेरे यांच्याकडील गटनेतेपद काढून ते नाशिकरोडचे अशोक सातभाई यांना दिल्याने तसे पाहता डेरे यादेखील पक्षामध्ये नाराज आहेत.

राज यांच्या सभा रद्दचा फटका
प्रचार सभांसाठी नवीन मुद्देच नसल्याने ऐनवेळी राज ठाकरे यांच्या नाशिकरोड आणि यशवंत महाराज पटांगणावरील दोन सभा रद्द करण्यात आल्या. अर्थात, याचा फटका उमेदवाराला बसू शकतो. महापालिका निवडणुकीच्या वेळी राज यांच्या सभेने संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते. या लाटेच्या आधारावरच मनसेने बाजी मारली होती.


आमदारकीची तयारी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची संधी आयती चालून आल्याने आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या दृष्टीने जणू काही ही पर्वणीच उपलब्ध झाली आहे. यामुळे निवडणूक लोकसभेची की विधानसभेची, असा प्रश्न नागरिकांना पडल्यावाचून राहत नाही. कारणही तसेच आहे. संबंधित इच्छुक मतदारांपर्यंत जाताना विद्यमान उमेदवाराचा प्रचार कमी, स्वत:वरच जोर देत असल्याने हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.