आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena's Coporators Quarreling Over Fund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधीतील घुसवाघुसवी, ‘राजगड’वर गरमागरमी - नगरसेवकांची मनसे कार्यालयात खलबते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पन्नास लाख रुपयांच्या नगरसेवक निधीच्या कामावरून सत्ताधारी मनसेत गरमागरमीची चिन्हे असून, सोमवारी पक्षातील अस्वस्थता कमी करण्यासाठी ‘राजगड’वरील बैठकीत अनेक नगरसेवकांनी गेल्या वर्षीच्या निधीतील कामे चालू वर्षात गृहीत धरण्याचे कारणच काय, असा सवाल केल्याचे वृत्त आहे. तसे केले तर एकप्रकारे ५० लाखांच्या निधीला आपसूकच कात्री लागणार असल्याची खंत व्यक्त केल्यावर महापौरांसह स्थायी समिती सभापतींनी दोन महिने सबुरीने काम करा, जास्तीत जास्त नगरसेवक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला.

पालिकेतील आर्थिक खडखडाट दुसरीकडे नगरसेवकांना समजावण्यासाठी कमी पडलेल्या महापौरांमुळे सत्ताधारी मनसेत असंतोष धुमसू लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून महापौर अशोक मुर्तडक यांनी शब्द दिल्यानंतरही ५० लाख नगरसेवक निधीची अंमलबजावणी होत नसल्याचे बघून शिवसेनेने शरसंधान साधले होते. त्यानंतर मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौरांसह अन्य पदाधिका-यांनी आयुक्त डॉ. गेडाम यांची भेट घेऊन कामे मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी पक्ष कार्यालयात सर्व नगरसेवकांना बाेलावून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या. यावेळी काही नगरसेवकांनी गतवर्षी नगरसेवक निधीतून जी कामे मंजूर झाली, तीच कामे पुन्हा यंदाही घुसवण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार केली ही कामे वेगळीवेगळी करावी, अशी मागणी केली असता सभापती ढिकले यांनी नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिला. मागील नगरसेवक निधीसंदर्भात पुन्हा आयुक्तांशी चर्चा करू, असेही सांगितले.

‘राजगड’वर महापौर अशोक मुर्तडक नगरसेवकांची बंद दाराआड सोमवारी सायंकाळच्या सुमारास चर्चा सुरू होती. या ठिकाणी उभी असलेली पदाधिका-यांची वाहने.

महापौरांना आश्वासन, विरोधकांना झटका
महापौरांनी५० लाखांच्या निधीस आयुक्तांच्या मान्यतेचा निरोप सर्व गटनेत्यांना दिला. त्यानुसार, नगरसेवकांनी प्राधान्यक्रमानुसार कामे सांगावीत, असेही गटनेत्यांना सांगितले जात होते. दुसरीकडे मात्र महापौरांच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते बडगुजर काही नगरसेवकांनी आयुक्तांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी अद्याप असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्ष संभ्रमात असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

अभिनंदन केले, परंतु अंमलबजावणीचे काय?
शिवसेनेनेनगरसेवक निधीबाबत सूचना केल्यावर महापौरांनी तातडीने त्याची दखल घेत आयुक्तांची भेट घेऊन समस्या सोडवली म्हणून त्यांचे अभिनंदनच आहे. परंतु, आता ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले तर प्रयत्नांचे चीज होऊ शकेल. अजयबो रस्ते, गटनेता,शिवसेना

वादावादी आणि राजीनाम्याची शक्यता
महापौरांची उदासीन भूमिका मनसेतील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मनसे गटनेते अशाेक सातभाईंनी साेमवारी नगरसेवक निधीबाबत आयुक्तांनी जाब विचारण्याची भूमिका पत्रकारांपुढे जाहीर केली. माध्यमांकडे भूमिका मांडण्याच्या मुद्यावरून ‘रामायण’वर सातभाई महापौरांमध्ये शाब्दिक खटके उडाल्याची चर्चा होती. त्यानंतर ‘राजगड’वर सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी सत्ताधारी असून, कामे होणार नसतील तर अर्थ काय, असा सवाल केल्यावर सभागृहनेत्यांनी नकारात्मक विचार करू नये, असा टोला महापौरांनी लगावला. त्यावर जाधवांनी वस्तुस्थिती मांडण्यात गैर काय, असा सवाल केला. त्यानंतर सातभाईंनी कामे तर होत नाहीत, मात्र विरोधकांच्या आराेपांना उत्तर देण्याचीही मुभा नसल्याची खंत व्यक्त केली. असे हाेणार असेल तर पदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात सातभाई यांना विचारले असता त्यांनी मंगळवारी भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.