आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून अपडेट: नाशिकमध्ये विक्रमी पाऊस; नगर, रायगड, पुणे जिल्ह्यालाही झोडपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला आलेला पूर. - Divya Marathi
नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला आलेला पूर.
पुणे/नाशिक/ औरंगाबाद/नागपूर- पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.  नाशिकच्या देवळे पुलावर पुराचे पाणी आले असून घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसाने जिल्ह्यातील आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहराला पहाटे पुराचा तडाखा बसला. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून तो 50.60 टक्के इतका झाला आहे. धरण परिसरात 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द असणाऱ्या लोणावळ्यात जोरदार पाऊस सुरु असून सकाळपर्यत 213 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून 193 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  दारणा, भाम नद्यांना पूर आला आहे. दिंडोरी तालुक्यातही रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.  
 
अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस
शिर्डीतही काही दिवस दडी मारल्यानंतर पावसाने पुनरागमन केले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
संगमनेर, अकोले भागात मुसळधार तर श्रीरामपूर, शिर्डी, राहता परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत.
 
मावळ तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला
पुण्यातील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या क्षेत्रामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. शहरात सकाळपर्यंत २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील वाडिवळे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला  आहे. औरंगाबादमध्येही रिमझिम पाऊस सुरु आहे. येत्या 24 तासात कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईतही पाऊस परतला आहे.
 
इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला पावसाचा जोर
नाशिकमध्ये काल सकाळी साडेआठ वाजल्यापासून आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 72 मिमी पाऊस पडला आहे. पुराची ओळख असलेला दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. पंचवटी विभागीय कार्यालयाजवळ लिंबाचे झाड पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.  देवळाली कॅम्पसह ग्रामीण भागात रात्रीपासून संततधार सुरु आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला पावसाचा जोर अधिक आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा 44 टक्क्यांवर पोहचला आहे.  
 
नागपूरात पाऊस
नागपूर शहरात मध्यरात्रीनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
धुळ्यातही पावसाची हजेरी
धुळे जिल्ह्यात तब्बल 20 ते 22 दिवसांपासून पाऊस झालेला नव्हता. मात्र शुक्रवारी रात्री शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. धुळे व साक्री तालुक्यांना मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. शिंदखेडा तालुक्यात 5, तर शिरपूर तालुक्यात 27 मि.मी. पावसाची नोंद झाली. पिकांसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याने बळीराजाला आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. जोरदार पावसाअभावी अजुनही दुबार पेरणीचे संकट  कायम आहे.
बातम्या आणखी आहेत...