आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस अराउंड ऑस्ट्रिया 100 तासांत पूर्ण, सर्वाधिक कठीण स्पर्धेत महाराष्ट्राच्या 2 सायकलपटूंची जिद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्पर्धेच्या प्रारंभीच १४ तास गारांचा वर्षाव सुरू होता. दुसऱ्या दिवशीही एक तास तुफानी हिमवादळासह गारा पडत असल्याने निम्म्या सायकलपटूंनी स्पर्धा सोडली. परंतु ८ महिन्यांच्या अथक प्रशिक्षणानंतर ऑस्ट्रियापर्यंत पोहोचल्यानंतर स्पर्धा अर्धवट न सोडण्याचा निर्धार करत नाशिकच्या लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’सारखी जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धा पार केली. स्पर्धा पूर्ण करणारी ही भारतातीलच नव्हे, आशियातील पहिली जोडी आहे. आल्प्सच्या पर्वतराजीतील ९ शिखरे पूर्ण करताना २२०० किलोमीटरचे अंतर १०० तासांच्या आत कापण्याचे अवघड काम या जोडगोळीने पूर्ण केले. ९ वर्षांपासून ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’ ही स्पर्धा जगातील सायकलपटूंच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

अनेक भारतीय,  आशियाई सायकलपटू सहभाग नोंदवतात. मात्र अत्यंत प्रतिकूल वातावरण आणि महाकाय उंचीची तब्बल ९ शिखरे पूर्ण करत स्पर्धा पूर्ण करण्याचा मान कुणाही आशियाई व्यक्तीला पटकावता आला नव्हता. तो मान यंदा पन्नू आणि दुबे यांनी पटकावला.  कोणतेही नियम न मोडता, एकही पेनल्टी न लावून घेता १०० तास पूर्ण व्हायला ७ मिनिटे शिल्लक असताना त्यांनी ही शर्यत पूर्ण केली.
 
अशी असते स्पर्धा   
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक १२५०० फूट चढ, उतार असलेला रस्ता तसेच ग्रॉसग्लॉकनेरसारख्या उंच ठिकाणांसह एकूण ९ शिखरे पार करत निर्धारित १०८ तासांच्या आतच ही स्पर्धा पूर्ण करायची होती. परंतु त्यांनी ती १०० तासांच्या आत पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी ‘रेस अराउंड ऑस्ट्रिया’ स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. प्रारंभी १००, २००, ३००, ५०० तर अखेरच्या टप्प्यात १००० किमीचा सराव वाढवत नेला. दरम्यानच्या काळात भारत यांनी गोवा - कर्नाटक – गोवा अशी १००० किमीची अल्ट्रा स्पाइस रेस जिंकल्याने आत्मविश्वासदेखील वाढला. चैतन्य वेल्हाळ हे सर्वात वेगवान भारतीय अल्ट्रा-सायकलस्वार आणि पाहिले प्रमाणित आयर्नमॅन प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व प्रकारचा सराव टीम इन्स्पायर इंडियाकडून करून घेतला. इन्स्पायर इंडिया कंपनीच्या दिव्या ताटे, मोनीश देशमुख आणि संजय मोकळ या टीमचे योगदानदेखील तितकेच मोठे असल्याचे भारत यांनी नमूद केले.

खडतर परिश्रमातून यश
आठ महिने खडतर परिश्रमातून हे यश गाठता आले. ५ जणांच्या टीम मेंबर्सनी जेवणापासून आरोग्यापर्यंत आणि नेव्हिगेशनपासून वाहतूक नियमावलीपर्यंत दक्षता घेतल्याने शर्यत पूर्ण करता आली.
- लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे,  सायकलपटू.

‘रेस’ आकड्यांमध्ये   
- २२०० किलोमीटरची रेस   
- १२७०० फुटांचे सर्वोच्च शिखर   
- ९ शिखरांचा रेसमध्ये समावेश   
- १०८ तासांत रेस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट   
- १०० तासांच्या आत पूर्ण केली शर्यत   
- ९ वर्षांपूर्वी सुरू झालेली रेस पूर्ण     करणारी पहिली आशियाई जोडी   
- ९ टीम सहभागी, एक टीम दोघांची
 
बातम्या आणखी आहेत...